– दुसरबीड ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य, भोंगळ कारभारामुळे गावात तीव्र पाणीटंचाई!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या दुसरबीड येथे पिण्याच्या पाण्यासाठी आमरण उपोषणाला बसण्याची दुर्देवी वेळ सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांवर आली आहे. ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य व ढिसाळ कारभारामुळे या गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. काँग्रेसचे नेते जुनेद अली, गजानन जायभाये, सुनील जायभाये, शहेदा पठाण, हलीम खा पठाण, अर्जुन घुगे, पांडुरंग वाघ आदी राजकीय व सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थांना पाणी मिळवून देण्यासाठी उपोषण करत आहेत. तर या उपोषणाकडे अद्याप प्रशासकीय यंत्रणेसह सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघाचे आमदार तथा माजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीही दुर्लक्ष चालविल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत दुसरबीडची आहे या. ग्रामपंचायतीला चार ठिकाणांहून पाण्याची व्यवस्था आहे, पण ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. आता उन्हाळ्यात तापमान ४३ सेल्सिअसच्यावर तापमान गेलेले असून, फक्त पाण्यासाठी दुसरबीडकरांची पायपीट सातत्याने होत आहे. घरातील लहान लेकरांपासून ते महिला, पुरुष हे पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकत आहेत. एकीकडे पंतप्रधान मोदी व देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये व देशांमध्ये जलजीवन मिशन योजनेतून पाणी देणार असल्याचा भोभाटा करत आहेत, तर दुसरीकडे दुसरबीडसारख्या गावात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आलेली आहे. ग्रामपंचायतला पिण्याचे पाण्याचे तसेच वापरण्याच्या पाण्याचे नियोजन करता येत नाही, हे ग्रामपंचायत प्रशासनाचे तसेच जिल्हा प्रशासनाचे मोठे अपयश आहे. त्यामुळेच दुसरबीड गावाला नियमित नळाद्वारे पाणी देण्यात यावे, फोडलेले सिमेंट रस्ते लवकरात लवकर पूर्ववत करावेत, पावसाळा आल्यामुळे गावातील नाल्या साफसफाई करण्यात याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे नेते जुनेद अली, गजानन जायभाये, सुनील जायभाये, शहेदा पठाण, हलीम खा पठाण, अर्जुन घुगे, पांडुरंग वाघ आदी राजकीय व सामाजिक कार्यकर्ते व पाण्यासाठी त्रस्त असलेले गावकरी आमरण उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाकडे आमदार शिंगणे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी दुर्लक्ष चालविल्याने ग्रामस्थांतून तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे.