साखरखेर्डा (प्रतिनिधी) – सिंदखेडराजा तालुक्यातील १२३ रेशन दुकानदारांना तहसीलदारांच्याहस्ते फोरजी पॉस मशीन चे वाटप तहसील कार्यालयात करण्यात आले. या मशीनचा वापर योग्य पद्धतीने करुन एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे मार्गदर्शन तहसीलदार प्रविण धानोरकर यांनी केले. बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या रेशन दुकानदार यांची समस्या निकाली लागली असून, धान्य वाटप करताना रेशन दुकानदार व लाभार्थी यांच्यातला संघर्ष फार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. धान्य वाटप करताना होणारी व ऑनलाईन प्रणालीची येणारी अडचण फोरजी मशीनमुळे दूर झाली आहे.
आज २९ मे रोजी सिंदखेडराजा तहसीलचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्या हस्ते सिंदखेडराजा तालुक्यातील १२३ दुकानदारांना फोरजी मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी फोरजी मशीनसोबत ज्या लाभार्थ्यांचे बोटांचे ठसे उमटत नाही अशा लाभार्थ्यांसाठी डोळ्यांची आय स्कॅनर सुद्धा दुकानदारांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार यांनी दुकानदारांना मार्गदर्शन केले, की लाभार्थ्यांना योग्य वेळेत धान्य वाटप करावे व प्रशासनात सहकार्य करून वाटपात सिंदखेडराजा तालुका पहिल्या क्रमांकावर कसा येईल, याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. यावेळी पुरवठा निरीक्षक दादू मिया शेख पुरवठा, लिपिक संदीप बंगाळे, गोदाम व्यवस्थापक विकार शेख, तालुका स्वस्त धान्य संघटनेचे अध्यक्ष उद्धव नागरे , स्वस्त धान्य दुकानदार आसोलकर अण्णा , अमोल गवई , लालाराव देशमुख , भिकाजी तळेकर , गजानन मंडळकर , अशोक खरात , बबनराव जायभाये , मनोहर कायंदे , संजय देशमुख , राजू जायभाये, सिंदखेडराजा तालुका व्यवस्थापक गणेश जायभाये मेहकर तालुका व्यवस्थापक गजानन चांदणे व शेकडो दुकानदार यावेळी उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन बबनराव जायभाये यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल गवई यांनी मानले.