Head linesSINDKHEDRAJAVidharbha

‘वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन’; पण कसे? बसेसच नाहीत!

– एसटी महामंडळाचा अनास्थेपणा खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या पथ्यावर!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – लोकसंख्या वाढली, प्रवाशांची संख्या वाढली, पण राज्य परिवहन महामंडळाच्या बसची संख्या त्या तुलनेत कमी झाली आहे. असे काही चित्र ग्रामीण भागात बघावयास मिळते आहे. दोन दोन तास बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रवासी वैतागले आहेत. ही समस्या कोन सोडविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाट पाहीन पण एसटीनेच जाईन, असे आजही लालपरीचा प्रवास करणारे ग्रामीण भागातील प्रवासी म्हणत आहेत, पण आता वाट तरी किती पहायची, असा प्रश्न निर्माण झाला असून, एसटी महामंडळाच्या अनास्थेची ही बाब खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या चांगलीच पथ्यावर पडत आहे.
एसटी बसमध्ये चढताना प्रवाशांची झालेली प्रचंड गर्दी.

साखरखेर्डा हे गाव अगोदरच आडवळणी असल्याने शहरी भागात जाणार्‍या बसेसची संख्या बोटावर मोजण्याऐवढी आहे. २५ हजार लोकसंख्या असलेल्या गावाला ३५ गावे संलग्न आहेत. दररोज सकाळी सहा वाजल्यापासून बसस्थानकावर प्रवाशांची वर्दळ असते. सकाळी छत्रपती संभाजीनगर, जालना येथे जाण्यासाठी एकच बस उपलब्ध आहे. ती बस मेहकर येथूनच प्रवाशांनी खचाखच भरुन येते. येथील प्रवाशांना जागा मिळत नाही. कसेबसे प्रवासी प्रवास करत आहेत. चिखली येथे जाण्यासाठी किनगावजट्टू ते बुलढाणा बस सकाळी सात वाजता असते. तीही प्रवाशांनी भरलेली असते.

बंद केलेल्या बसेस सुरु न केल्यास प्रवासी संघटणेच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा संबंधित आगार व्यवस्थापक यांना देण्यात आला आहे.
– सय्यद रफीक, माजी सल्लागार समिती सदस्य, एसटी महामंडळ

लोणार ते खामगाव बसमध्येही अगोदरच प्रवासी असतात. किनगाव जट्टू ते अकोला ही बसमध्ये जागाच नसते. शेगाव ते परतूर या बसमध्ये पाय ठेवायला जागा मिळत नाही. ह्या महत्त्वाच्या पाच बसेस गेल्यानंतर प्रवाशांना दुपारच्या नंतर एक, दोन बसेस आहेत. त्याही कधी येतात तर कधी येतही नाही. चिखली येथे जाण्यासाठी दोन ते तीन तासांनंतर बस मिळते. साखरखेर्डा बसस्थानकावर दर १५ मिनिटाला एक खाजगी प्रवासी वाहतूक करणारे वाहन चिखलीसाठी धावते. मग दर तासाला बस का धाऊ शकत नाही, याची दखल घेऊन चिखली आगाराने नियमित बससेवा सुरू करावी, अशी मागणी आहे. मेहकर ते साखरखेर्डा रस्त्यावरसुध्दा खाजगी प्रवासी वाहतूक वाढली आहे. परंतु, संपूर्ण दिवसभर सहा बसच्या फेर्‍या दोन तासांच्या अंतरावर आहे. एकच बस ये जा करत आहे. त्याबसचे गेर पडत नाही. कधी ऑईल इंजिन जाम होते. त्यामुळे मध्येच उभी राहाते. मोफत प्रवास, सुरक्षीत प्रवास फक्त नावालाच उरला आहे. साखरखेर्डा येथून सकाळी सहा वाजता साखरखेर्डा ते जालना, सकाळी नऊ वाजता मेहकर ते साखरखेर्डा- देऊळगाव राजा, ह्या दोन बसेस मेहकर आगाराने बंद केलेल्या आहेत. खामगाव आगाराची खामगाव ते जालना ही बसही बंद केली आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बस नाही.शहरी भागात जाणार्‍या बसेसची संख्या बोटावर मोजण्याऐवढी आहे. याची दखल घेऊन खामगाव, चिखली, मेहकर आगाराच्या ज्या बसेस बंद आहेत. त्या तत्काळ सुरु कराव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!