मिसाळवाडी येथे चोरट्यांचा हैदोस सुरूच; शेतकर्याचे पत्राशेड फोडून चार कट्टे गहू चोरले!
अंढेरा (हनिफ शेख) – अंढेरा पोलिस ठाणेहद्दीतील मिसाळवाडी येथे चोरट्यांचा हैदोस सुरूच असून, शेतकरी प्रचंड धास्तावलेले आहेत. कालच शेतातील स्प्रिंकलरचे नोझल चोरीला गेल्यानंतर आता देवीदास आनंदा मिसाळ यांच्या पत्राशेडमधून शेडचे कुलूप तोडून चार कट्टे गहू चोरीस गेले आहेत. शेतमालाची व शेतसामानाची चोरी करणार्या चोरट्यांचा तातडीने कडेकोट बंदोबस्त करण्यात यावा, तसेच या शेतकर्यांना महसूल प्रशासनाने लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील व उपसरपंच हनुमान मिसाळ यांनी केली आहे.
मिसाळवाडी शिवारातील गट नंबर १५८ मध्ये देवीदास आनंदा मिसाळ यांचे पत्र्याचे शेड आहे. या शेडमध्ये त्यांनी नुकताच काढलेला गहू पोत्यात भरून ठेवलेला होता. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते शेडमध्ये आले असता, त्यांचे शेड अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून फोडलेले आढळून आले. त्यामुळे त्यांनी हा प्रकार तातडीने सरपंच बाळू पाटील व उपसरपंच हनुमान मिसाळ यांच्या कानावर टाकला. उपसरपंच हनुमान मिसाळ यांनी आपल्या सहकार्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली, व या घटनेची माहिती अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार विकास पाटील यांना दूरध्वनीद्वारे दिली. सरपंच बाळू पाटील यांनीही ठाणेदारांशी संपर्क साधून, गावात सातत्याने होत असलेल्या चोर्यांबाबत चिंता व्यक्त केली. गावाचे पोलिस पाटील रवी मिसाळ यांनीही देवीदास मिसाळ यांच्या गहू कट्ट्याच्या चोरीची खबर ठाणे अमलदारांना दिली. याबाबत पोलिसांत रितसर तक्रार दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतली पोलिस अधीक्षकांची भेट!
दरम्यान, सातत्याने शेतकर्यांच्या शेतमाल, व शेतसामानाच्या चोर्या होत असल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करून, चोरी गेलेल्या शेतमालाचा शोध लावावा, अशी मागणी केली. आळंद परिसरातील बैलचोरी, मिसाळवाडी व इसरूळ परिसरातील स्प्रिंकलरच्या चोर्या, तसेच शेतमालांच्या चोर्यांबाबत तुपकर यांनी पोलिस अधीक्षकांकडे शेतकर्यांची कैफियत मांडली. मिसाळवाडी येथील शेतमाल व शेतसामानाच्या चोर्यांबाबत कालच उपसरपंच हनुमान मिसाळ यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याशी संपर्क साधून, त्यांना शेतकर्यांच्या भावना अवगत केल्या होत्या. त्याची त्यांनी गांभिर्याने दखल घेतली होती.
दरम्यान, कालच मिसाळवाडी येथील शेतकरी सतिष विष्णू भगत यांचे १२ नोझल, राजू रूस्तुमा मिसाळ यांचे १२ नोझल, नितीन नारायण मिसाळ यांचे १३ नोझल, अण्णा तेजराव मिसाळ यांचे १३ नोझल, भारत अंबादास भगत यांचे १० नोझल, उपसरपंच हनुमान मिसाळ यांचे २२ नोझल चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी आज उपसरपंच हनुमान मिसाळ यांच्या लेखी तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हे दाखल केले असून, आरोपीचा शोध सुरू केला होता. त्यानंतर आज पुन्हा गव्हाचे कट्टे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्याने गावातील शेतकरी प्रचंड धास्तावलेले आहेत. शेतमाल व शेतीसाहित्य चोरीच्या या वाढत्या घटनांमुळे शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, चोरट्यांचा लवकरच बंदोबस्त करून त्यांना गजाआड करू, असे ठाणेदार विकास पाटील यांनी निक्षून सांगितले आहे.