माझ्या कार्यकर्त्यांवर खोटेनाटे गुन्हे दाखल करू नका; नाही तर ४ जूननंतर हिशोब चुकता करेन!
– मला सर्वच पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्याचा नीलेश लंकेंचा गौप्यस्फोट; विजय आपलाच असल्याचा दावा!
शेवगाव/नगर (बाळासाहेब खेडकर) – मला लोकसभेच्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी मदत केली असल्याने मी सर्वपक्षीय कार्यकर्ता असून, सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्यांनी निवडणुकीनंतर आकसबुद्धीचे राजकारण करून कार्यकर्त्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ते त्यांनी करू नयेत, अन्यथा ४ जूननंतर सर्व हिशोब चुकता केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा खणखणीत इशारा अहमदनगर लोकसभा मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी दिला आहे. शेवगाव तालुक्यातील कोनोशी येथे युवानेते राजेंद्र दौंड यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नीलेश लंके बोलत होते.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व केदारेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रतापराव ढाकणे, शिवशंकर राजळे, ज्येष्ठ नेते दिनकर पालवे, शिवसेना नेते रामदास गोल्हार, रफिक शेख, केदारेश्वर कारखान्याचे संचालक श्रीमंत गव्हाणे, गहिनीनाथ शिरसाट, भाजपचे बंडू रासने, शेवगाव बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, युवानेते नंदकुमार मुंडे, शिरीष काळे, बोधेगावचे उपसरपंच संग्राम काकडे, मयूर हुंडेकरी, बालमटाकळीचे उपसरपंच घोरपडे, शिंदे गटाचे शेवगाव तालुका अध्यक्ष साईनाथ आधाट, नामदेव कसाळ, वंचित आघाडीचे उमेदवार दिलीप खेडकर, नवनाथ खेडकर यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. राजेंद्र दौंड यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या तर माजी आ. नीलेश लंके म्हणाले, की पैसे कमविण्यापेक्षा जीवाभावाची माणसं सोबत असली तर जीवनात काही कमी पडत नाही. मी प्रस्थापितांच्या विरोधात सामान्य जनतेला नेहमी भरीव मदत केली आहे. माझी प्रस्थापितांच्या विरोधात लढाई सुरू आहे. लोकसभेत चारपिढ्या राजकारण करणार्यांच्या (सुजय विखे यांचे नाव न घेता) मोठ्या लोकांच्या विरोधात लढणे हे सोपे काम नव्हते, पण जिवाभावाचे सामान्य लोक व सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच अनेक नेत्यांनी मला निवडणुकीत भरीव मदत केली असल्याने मोठ्या फरकाने विजय होणार असल्याचे लंके यांनी जाहीरपणे सांगून, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा आभारी असल्याचे ते म्हणाले. मला असंख्य अदृश्य राजकीय शक्तीने मदत केली आहे, कोणी कोणी मदत केली आज जाहीर करणार नाही पण निकालानंतर सर्व कळणार आहे, असेही लंके म्हणालेत.
आमच्यावर सातत्याने गुंडगिरीचा आरोप केला जात आहे, पण आम्ही गुंड नाहीत तर गरिबाला छळणारांचा बंदोबस्त करून गुंडगिरी थांबविण्यासाठी प्रयत्न केला आहे. मी कमी शिक्षित, इंग्रजी येत नाहीं, असा आरोप झाला. पण मी आयटीआयचा साध फिटर आहे. कोणता पान्हा कसा लावायचा याचा खटका मला माहित आहे, ते आपणनास दिसून येईल, असा टोलाही लंके यांनी सुजय विखे यांना लगावला.
महसूल व पोलीस यंत्रणा कोण चालवतो हे पाहावे लागेल…!
शेवगाव तालुक्यासह मतदारसंघात खतपाणी घालून सामान्य कार्यकर्त्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करण्याचे उद्योग सुरू आहेत. भविष्यात सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, तसेच महसूल व पोलीस यंत्रणा कोण हाताशी धरून चालवतो ते भविष्यात पहावे लागेल, तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे नीलेश लंके यांनी याप्रसंगी आवर्जुन सांगितले.
———–