अल्पवयीन मुलीला घरासमोरून उचलून शेतात नेले; लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न!
– पीडित मुलीच्या वडिलांविरोधातही महिलेची विनयभंग, मारहाणीची तक्रार दाखल
चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या चांधई येथील एका १२ वर्षीय मुलीला घरासमोरून उचलून नेऊन तिला शेतात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना २५ मेरोजी घडली असून, पीडिताच्या आईने दिनांक २७ मेरोजी चिखली पोलीस स्टेशन येथे येऊन दिलेल्या तक्रारीवरून सुनील साहेबराव इंगळे, उमेश इंगळे, ज्ञानेश्वर इंगळे या तिघांविरुद्ध पॉस्को कायद्यासह अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे, पीडित मुलीच्या वडिलांविरोधातही ४५ वर्षीय महिलेने विनयभंग व मारहाणीची, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. या दोन्हीही घटनांचा अधिक तपास एसडीपीओ सुधीर भीमसिंग पाटील हे करत आहेत.
सविस्तर असे, की ३२ वर्षीय फिर्यादी असलेल्या आईने चिखली पोलिसांत तक्रार दिली. त्यात त्यांनी सांगितले की, दिनांक २५ मे रोजी त्यांचे पती कामानिमित्त चिखली येथे गेलेले होते. गावातील लाईट गेल्यामुळे १२ वर्षीय आपल्या मुलीला घरासमोरील पायरीवर बसून किराणा दुकानावर लक्ष देण्यास सांगून त्या स्वयंपाक करण्यासाठी घरात गेल्या. स्वयंपाक करत असतांना अंदाजे सायंकाळचे ८:१५ वाजेच्यादरम्यान शेताकडून त्यांना आपल्या मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी घराबाहेर येऊन बघितले असता, त्यांना त्यांची १२ वर्षीय मुलगी दिसून आली नाही. यावेळी त्या शेताच्या दिशेने जात असतांना लाईट आली. त्यावेळी त्यांच्याच गावातील सुनील इंगळे, उमेश इंगळे व ज्ञानेश्वर इंगळे हे पळत जातांना दिसले. तर त्यांची मुलगी ही शेतातील बोरजवळ बसलेली त्यांना दिसली, त्यावेळी ती रडत होती. यावेळी फिर्यादी आईने आपल्या मुलीला धीर देत काय झाले? असे विचारले असता, मुलीने सांगितले की, मी दुकानावर लक्ष ठेवत असतांना सुनील साहेबराव इंगळे तेथे आले व तुझे वडील कोठे गेले आहे? असे विचारले असता, ते कामानिमित्त चिखली येथे गेले असे मुलीने सांगितले. तेव्हा सुनील इंगळे याने तोंड दाबून मुलीला उचलून पाठीमागे असलेल्या शेतात घेऊन गेले. तेव्हा गावातील उमेश इंगळे व ज्ञानेश्वर इंगळे हे शेतातील बोरजवळ उभे होते. यावेळी तिघांनी पीडित बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असता, एका व्यक्तीच्या हातावर मुलीने यावेळी चावासुद्धा घेतला. लाईट गेलेली असल्याने अंधार असल्याने आरोपीने बारा वर्षीय मुलीला उचलून शेतात नेले. तेथे एकाने या मुलीचे पाय दाबून धरले, दुसर्याने हात दाबून धरले, तर एकाने तिची पॅन्ट काढून तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. यावेळी या मुलीने मोठ्या ताकदीने आरोपीच्या हाताला जोरदार चावा घेतल्याने, तसेच आरडाओरड केल्याने, आणि नेमके त्याचवेळी लाईट आल्याने आरोपीने तेथून पळून गेले म्हणून ही मुलगी थोडक्यात बचावली. आईने मुलीला घरी नेऊन आपल्या पतीला फोन करून सर्व घटना सांगितली. याबाबतची तक्रार पोलिसांना देण्यासाठी लगेच ते चिखली येथे आले. यावेळी मुलीला चक्कर आले असल्याने पोलिसांनी लगेच तिला चिखली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी मुलीला बुलढाणा येथे रेफर केले. तर सध्या मुलीचा उपचार तेथे सुरू आहे.
दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलीसांनी सुनील साहेबराव इंगळे, उमेश इंगळे, ज्ञानेश्वर इंगळे या तिघांविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या १८६० कलम ३५४ बी, ३५४, ३४, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, १२, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ चे कलम ३ (१), (डब्ल्यू) (आय), ३ (१), (डब्ल्यू) २, ३ (२) (व्हीए) या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक सुधीर भीमसिंग पाटील हे करत आहेत.
पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर, दुसर्या बाजूने ४५ वर्षीय महिलेनेदेखील पीडित मुलीच्या वडिलांविरोधात विनयभंग व मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. २५ मेरोजी सायंकाळी साडेसात वाजता ही महिला एकटी घरी स्वयंपाक करत असताना, आरोपी घरात घुसला, मुलगा कुठे आहे म्हणून शिविगाळ केली, तसेच अंगाशी झटापट करत हात धरून जवळ ओढले व विनयभंग केला. तेवढ्यात महिलेचे पती घरी आल्याने त्यांनी आरोपीच्या तावडीतून महिलेची सुटका केली असता, त्यांच्या पतीलादेखील आरोपीने मारहाण केली. महिलेने स्वतःच्या संरक्षणासाठी घराजवळ दरवाजाला लावलेला दगड फेकून मारल्याने या आरोपीचे तोंड फुटले. या आरोपीने जाताना महिला व तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकीही दिली, अशा तक्रारीवरून पीडित मुलीच्या वडिलांविरोधात २८ मेरोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.