Breaking newsBuldanaHead linesVidharbha

सोयाबीन, भुईमुगाला ‘हमी’ पेक्षा भाव ‘कमी’!

– बाजार समित्यांच्या ‘घाण्यात’ शेतकर्‍यांचेच निघतेय ‘तेल’
– आचारसंहितेच्या ‘आड’ लपले सत्ताधारी व विरोधक!
– शेतकरी नेतेही गप्पगार, शेतकर्‍यांचा वाली कोण?

बुलढाणा (बाळू वानखेडे) – सोयाबीनसह शेतमालाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असून, उच्च प्रतीचे तेलवान असलेल्या भुईमूगाची शेंगही अतिशय कमी भावात विकल्या जात आहे. राज्य सरकारच्या बाजार समितीतच हमीपेक्षा कमी दाम मिळत असून, ऐन पेरणीच्या तोंडावरच शेतकर्‍यांचे बाजार समिती ‘तेल’ काढत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. बाजारात भाव कमी मिळाल्यास भरपाई म्हणून शासनाने जाहीर केलेली भावांतर योजनाही गाजराची पुंगीच ठरल्याचे दिसत आहे. बाजार समितीतच शेतकरी नागावला जात असताना सत्ताधारी व विरोधक मात्र आचारसंहितेच्या ‘आड’ लपल्याचे दिसून येत असून, शेतकरी नेतेही गप्पगार असल्याने आता शेतकर्‍यांचा वाली कोण? असा सवालही या निमित्ताने विचारला जात आहे.
https://breakingmaharashtra.in/

गेल्या उन्हाळ्यात जिल्ह्याला अवकाळी पावसाने तुफान झोपल्याने रब्बी, उन्हाळी पिके हातची गेली. त्यामध्ये खर्चही वसूल झाला नाही. शेतकर्‍यांची सर्व मदार खरिपाच्या पिकांवर असल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा जिल्ह्यात झाला होता. परंतु, कमी पाऊस त्यातच एलोमोजक अळीचा अ‍ॅटॅक यामुळे एकरी दोन ते तीन पोते सोयाबीन झाली तर उडीद, मूग ही पिके दाळीलाही झाले नाहीत. ही कसर आता रब्बी व उन्हाळीत भरून काढू असा निश्चय करत जिल्ह्यातील संग्रामपूर, खामगाव, मेहकरसह अकोला जिल्ह्यातील पातूर, बाळापूरसह काही तालुक्यात भुईमूगाचा पेरा झाला. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी भुईमूगाची शेंग शेतातूनच सात हजाराच्यावर क्विंटलने विकल्या गेली. तर भाव नसल्याने सोयाबीन शेतकर्‍यांच्या घरातच पडून आहे. आता खरिपाची पेरणी करायची असल्याने सोयाबीन विकायला काढली आहे. सोयाबीनला मात्र शासनाचा ४६०० रुपये क्विंटल हमीभाव असताना बाजारात सोयाबीन ४ हजार ते ४३०० रुपये क्विंटल एवढ्या कमीने खरेदी केल्या जात आहे, तर भुईमूगाची शेंग सरासरी ५५०० रूपये क्विंटल भावाने खरेदी केल्या जात आहे. विशेष म्हणजे, पाऊस नसल्याने यावर्षी पेराही कमी आहे. बाजार समितीत शेतकरी हा सर्वांच्या डोळ्यादेखत नागवला जात असताना सत्ताधारी व विरोधक मात्र आचारसंहितेच्या ‘आड’ लपले असल्याचे अतिशय बटबटीत असे वास्तव पुढे आले आहे.


बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी भाव मिळाल्यास फरकाची रक्कम म्हणून राज्य शासनाने निवडणूक काळात भावांतर योजना जाहीर केली होती. परंतु आता ही योजना गाजराची पुंगी ठरल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, शेतकर्‍यांसाठी सदैव रस्त्यावर असल्याचे छातीठोक सांगणारे शेतकरी नेते मात्र गप्पगार असल्याचे दिसून येत असून, नुसता निवडणुकीपुरताच आमचा वापर झाला का? असा सवालही केला जात असताना आता आमचा वाली कोण? असेही शेतकरी बोलत आहेत.


आचारसंहितेमुळे पैसे वापरण्याची मर्यादा असल्याने व्यापार्‍यांना अडचण येत असून, ४ जूननंतर भावात सुधारणा होणार असल्याची दाट शक्यता आहे. असे खामगाव बाजार समितीचे सचिव गजानन आमले यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलतांना सांगितले. वाढती महागाई व मशागतीचा डोईजड खर्च पाहता, सोयाबीनला क्विंटल मागे सहा हजार तर भुईमूग शेंगीला आठ हजार रुपये भाव मिळायला पाहिजे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत असताना शेतकरी नेते, मावळते खासदार, व खासदारकीची निवडणूक लढविणारे नेते मात्र शेतकरीहिताच्या या मागण्यांबाबत मूग गिळून बसल्याने शेतकर्‍यांतून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. फक्त मतदानापुरते आम्हाला मधाचे बोट लावले, आता गरज संपली आणि आम्ही मेलो तरी यांना घेणेदणे नाही का, असा सवाल शेतकरी करत आहेत. यांचा हिशोब आता विधानसभा निवडणुकीत चुकता करू, असा इशाराही शेतकरी देत आहेत.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!