Head linesVidharbha

पहिल्यांदाच मे महिन्यात लागला इयत्ता दहावीचा निकाल!

बुलढाणा (संजय निकाळजे) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आजवरच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच दहावीचा निकाल मे महिन्यात जाहीर झाला. दहावीच्या परीक्षेनंतर दोन महिन्यात निकाल जाहीर करण्यात आला असून, येत्या काळातही विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या संधी मिळण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शक्य तेवढ्या निकाल लवकर लावण्याचा निर्णय घेणे गरजेचे आहे. यावर्षी गुणवंतांचादेखील टक्का वाढला असून, परीक्षेदरम्यान अमरावती विभागात ७ गैरप्रकारही घडले आहेत. विशेष म्हणजे, अमरावती विभागातून सात विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत.

राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावी या परीक्षेसाठी विद्यार्थी संख्या सुमारे ३० लाखापर्यंत असते. त्यामुळे परीक्षेचे नियोजन, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणी, निकाल तयार करणे या प्रक्रियेची मोठी जबाबदारी राज्य मंडळाला पार पाडावी लागते. दहावीच्या निकालावर अकरावी, पदविका, आयटीआय प्रवेश प्रक्रिया तर बारावीच्या निकालावर उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रिया अवलंबून असतात. आतापर्यंत बारावीचा निकाल मेअखेर ते जूनचा पहिला आठवडा या काळात तर दहावीचा निकाल जूनमध्येच जाहीर केला जायचा. कोरोना प्रादुर्भावानंतर गेल्या वर्षी परीक्षांचे वेळापत्रक, निकाल वेळेत जाहीर करण्याबाबत अधिक काटेकोर नियोजन करण्यात आले. त्यानुसार गेल्यावर्षी दहावीचा निकाल २ जूनला जाहीर करण्यात आला होता, मात्र यंदा बारावीचा निकाल २१ मे तर दहावीचा निकाल २७ मे रोजीच जाहीर करण्यात आला.
मंडळाच्या आजवरच्या नियोजनापेक्षा दोन्ही निकाल एक आठवडा आधीच जाहीर करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष परीक्षांच्या गुणांसाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर, उत्तरपत्रिकांची तपासणी आणि संकलन शक्य तितक्या लवकर करणे, निकालाची प्रक्रिया वेळेत तयार करण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लवकर जाहीर होण्याचे श्रेय परीक्षा प्रक्रियेतील राज्य मंडळ कर्मचारी, अधिकारी, शिक्षकांचे आहे. पुढील वर्षी बारावी आणि दहावीच्या परीक्षा अधिक लवकर घेण्याचे नियोजन केल्यास निकालही लवकर जाहीर होतील. त्याचा फायदा पुरवणी परीक्षा लवकर घेणे, विद्यार्थ्यांना प्रवेश लवकर मिळणे यावर होऊ शकतो.


गुणवंतांचा टक्का वाढला, राज्यात १८७ तर विभागात ७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण

दहावीच्या निकालात यावर्षी गुणवंतांचादेखील टक्का वाढला आहे. त्यात १०० टक्के गुण मिळवलेल्या आणि ९० टक्क्याहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी आहेत. यंदा राज्यातील १८७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. एकट्या लातूर विभागातील १२३ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. पुणे विभागातील १०, नागपूर विभागातील १, छत्रपती संभाजीनगर भागातील ३२, मुंबई ८, कोल्हापूर ३, अमरावती विभागातील ७, कोकण विभागातील ३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. गेल्यावर्षी १५१ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले होते. २०२० मध्ये २४२, २०२१ मध्ये ९५७, २०२२ मध्ये १२२ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले होते. एकूण निकाल, शंभर टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येसह गुणवंताचा टक्काही वाढला आहे. यंदा ८१ हजार ९९१ विद्यार्थ्यांना ९० टक्क्याहून अधिक गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षी ६६ हजार ५७८, २०२२ मध्ये ८३ हजार ६०, तर २०२१ मध्ये एक लाख ४ हजार ६३३, आणि २०२० मध्ये ८३ हजार २७२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्याहून अधिक गुण मिळाले होते.


दहावीच्या परीक्षेत राज्यात २९९ तर विभागात ७ गैरप्रकार

राज्य परीक्षा मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत राज्यात २९९ गैरप्रकारची नोंद झाली आहे. कॉपी केल्याप्रकरणी १४५ विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली. तसेच तोतयेगिरीचे २ प्रकरण झाली असून, उत्तरपत्रिकेचे पान फाडणे, आक्षेपार्ह लेखन करणे अशा स्वरूपाचे १५२ प्रकार आढळून आले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातून सर्वाधिक ८६ गैरप्रकारची नोंद झाली. पुणे विभागात १९, नागपूर विभागात १६, लातूर विभागात १०, अमरावती विभागात ७, नाशिक विभाग ६, आणि कोकण विभागात १ गैरप्रकार घडला. परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेचे पान फाडणे, अक्षपार्ह लेखन अशा स्वरूपाच्या या प्रकारांमध्ये सर्वाधिक ७३ गैरप्रकार छत्रपती संभाजीनगर विभागात झाले आहेत. नाशिकमध्ये ४६, कोल्हापूरमध्ये १५, मुंबई १२ ,लातूर ४, पुणे विभागात २ प्रकार नोंदवले गेले. पुणे आणि विभागात तोतयेगिरीचे दोन प्रकार उघडकीस आले. गेल्यावर्षी परीक्षा काळातील आणि परीक्षेनंतर असे एकूण ३६६ प्रकार निदर्शनास आले होते. परीक्षेत प्रकार घडू नये म्हणून राज्य परीक्षा मंडळाने व्यवस्था केली होती. जिल्हास्तरावरही पथके नेमण्यात आली होती. विद्यार्थ्यांसमोर शिक्षासूचीचे जाहीर वाचन करण्यात आले होते, मात्र घडलेल्या गैरप्रकाराची संख्या बघता परीक्षेमध्ये गैरप्रकार घडणे हे व्यवस्थेचे अपयश आहे. असेच म्हणावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!