चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील पळसखेड जयंती शिवारातील दिलीप राजाभाऊ खरात यांच्या गोठ्यातील आठ बकर्यांवर लांडग्याने हल्ला करून ठार केल्याची घटना दि. २८ मे च्या रात्री घडली. या शेतकर्याला तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी ऐरणीवर आली आहे.
पळसखेड जयंती शिवारात लांडग्यांचा सुळसुळाट झाला असून, त्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष आहे. या शिवारातील गट नं. ११७ मधील दिलीप राजाभाऊ खरात यांच्या गोठ्यामधील आठ बकर्यांवर लांडग्याने हल्ला चढून आठही बकर्यांना ठार केले. त्यामुळे शेतकर्याचे अतोनात नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा वनविभाग अधिकारी खान आणि तलाठी भुसारी यांनी पंचासमक्ष केला, तर पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश गाडे यांनी शवविच्छेदन केले. सदर शेतकर्याने शासनाकडून मदत मिळण्याची मागणी केली आहे.