उमेदवारांची ‘चुकलेली निवड’ ‘महायुती’ला ८ ते १० जागांवर देणार फटका?
– शेतकरी नेते रविकांत तुपकरांमुळे ‘महायुती’ची बुलढाण्याची जागा धोक्यात?
मुंबई (खास प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत ४५+चा नारा देणार्या महायुतीला जोरदार झटका बसणार असल्याचे राजकीय संकेत प्राप्त होत आहेत. या पराभवाचे खापर कुणावर फोडायचे? याचेही गुप्तपणे नियोजन महायुतीत सुरू असल्याची चर्चा आहे. दरम्यान, बुलढाणा, वर्धा, भंडारा-गोंदिया, गडचिरोली या मतदारसंघात नवीन चेहर्यांना संधी दिली असती, तर या जागा राखता आल्या असत्या, असा सूरही आता महायुतीतून ऐकायला येत आहे. विशेष म्हणजे, बुलढाण्यातून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह एका वरिष्ठ नेत्याने महायुतीच्या नेत्यांसमोर धरला होता. परंतु, शिंदे गटाने ही जागा फारच प्रतिष्ठेची केली. त्याचा फटका महायुतीतील इतर दोन राजकीय पक्षांना आता बसणार असल्याचे सांगितले जात आहे. तुपकर इतक्या जोराची टक्कर देतील, याचा अंदाज कुणाला आला नाही. त्यांच्यामागे नेमकी कोणती ‘पावर’ उभी राहिली? याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगते आहे.
राज्यभरातून येणारे विविध रिपोर्ट आणि काही दूरचित्रवाणी वाहिन्यांनी सर्वेक्षण संस्थांच्या माध्यमातून केलेले मतदानोत्तर सर्वेक्षण यांचे अंदाज महाआघाडी व महायुतीच्या नेत्यांना प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे एकीकडे महाआघाडीच्या गोटात आनंदाची लहर असताना, व शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ‘मॅन ऑफ दी मॅच’ ठरणार असल्याचे चित्र असताना, दुसरीकडे महायुतीच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण आहे. विदर्भातील काही जागांवर उमेदवार बदलून द्यावेत, असा महायुतीतील एका बलाढ्य नेत्याचा सूर होता. खास करून बुलढाणा, वर्धा, भंडारा-गोंदिया, गडचिरोली या मतदारसंघात नवे चेहरे द्यावेत, असा या नेत्याचा आग्रह होता. परंतु, तसे झाले नाही. या जागा प्रतिष्ठेच्या करण्यात आल्यात. राज्यातील ८ ते १० मतदारसंघात नवे चेहरे दिले असते तर या जागा राखता आल्या असत्या, असाही एक मतप्रवाह सद्या महायुतीत पहायला मिळतो आहे. ज्या खासदारांबाबत मतदारांमध्ये नाराजी होती, तसेच अॅण्टी इन्कबन्सीचा फटका बसणार हे माहिती होते, तरीदेखील निव्वळ प्रतिष्ठेपोटी या जागा दिल्या गेल्यात. त्यामुळे महायुतीच्या संभाव्य पराभवात या ८ ते १० जागांचा मोठा फटका बसणार असल्याचे राजकीय धुरिणांचे खासगीत म्हणणे आहे.
शिंदे गटाने यवतमाळ-वाशिम या मतदारसंघात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देणे, बुलढाण्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना सोडून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देणे, व त्यामुळे महायुतीच्या मतांत मोठी फूट पडून त्याचा फायदा शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांना होणे, तसेच, दक्षिण मुंबईची जागा शिंदे गटाच्या यामिनी जाधवांऐवजी भाजपकडून राहुल नार्वेकर किंवा मंगलप्रभात लोढा यांनी लढवायला हवी होती. धाराशीवमध्ये भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना घड्याळ चिन्हावर लढवायला लावणे, हेदेखील विरोधात गेलेले चित्र होते. शिरूरमध्ये शिंदे गटाच्या आढळराव पाटलांना आयात करून घ़ड्याळ चिन्हावर उभे करणे, तसेच अजित पवारांच्या कोट्यातून ‘रासप’च्या महादेव जानकरांना परभणीच्या मैदानात उतरवणे, हे प्रयोग फसणार असल्याचे राजकीय धुरिणांचे म्हणणे आहे.
या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा तापलेला मुद्दा आणि मुस्लीम मतांनी एकगठ्ठापणे महाआघाडीच्या उमेदवारांना केलेले मतदान यामुळे महायुतीच्या जागा धोक्यात आलेल्या आहेत. महायुतीकडून उमेदवार देताना चुकलेली निवड यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात जवळपास ८ ते १० जागांवर महायुतीला फटका बसणार असल्याचे जोरदारपणे सांगितले जात आहे. तरीदेखील ४ जूनला काय निकाल बाहेर येतात, याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.