बिबी (ऋषी दंदाले) – बिबी पोलिस ठाणेहद्दीत भररस्त्यावर मित्र जमवून चक्क तलवारीने केप कापून हिरोगिरी करणार्या २० वर्षीय तरूणाची बिबी पोलिस ठाण्याचे ‘सिंघम’ ठाणेदार संदीप पाटील यांनी चांगलीच जिरवली. या युवकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्याला तलवारीसह गजाआड करण्यात आले आहे. भररस्त्यावर अशाप्रकारची गुंडगिरी करणे तरूणांना चांगलेच भोवणार आहे.
सविस्तर असे, की दिनांक २८ मेरोजी बिबी पोलीस स्टेशन हद्दीतील खापरखेड घुले ता. लोणार या गावातील वैभव प्रल्हाद घुले (वय २०) या युवकाने त्याचा वाढदिवस असल्याने त्याने आपल्या मित्रांना आमंत्रित करून गावात रोडवर मोटरसायकलवर बॉस नाव लिहिलेले चार केक तलवारीच्या साहाय्याने कापून व हातात तलवार घेऊन दहशत निर्माण केली, व धड्याक्यात वाढदिवस साजरा केला. मात्र त्याचे हेच कृत्य बिबी पोलिसांना समजताच दि.२९ मेरोजी पोलीसांनी वैभव घुले यास ताब्यात घेऊन विचारपूस करत त्याच्याकडून एक तलवार जप्त केली व त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला. स्वतःला बॉस समजून भररस्त्यावर गुंडगिरी करणार्या या तरूणाला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. ही धडाकेबाज कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संदीप पाटील, पोलीस अंमलदार अरुण सानप, यशवंत जैवाळ यांनी केली.
अलीकडच्या काळात तरुणांमध्ये वाढदिवसाच्यानिमित्ताने डीजे वाजविणे, तलवारीने केक कापणे असे कृत्य करून वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार वाढत आहे. त्यातून एखादा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांकडून अशा कृत्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे वाढदिवसाला तलवारीने केक कापू नका, डीजे वाजवू नका, पोलिसांचे आपल्यावर लक्ष आहे, असेच बिबी पोलीसांच्या कारवाईवरून दिसून येते.