गळा चिरला, पोटावर मारहाणीच्या खुणा, बोटे छाटलेली; अर्धवट जळालेला तरूणीचा अर्धनग्न मृतदेह आढळल्याने खळबळ!
– असोला शिवारातील युवतीच्या खुनाचा अद्याप तपास लागला नसताना पुन्हा तसाच आणखी एक खून उघडकीस!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – जवळपास २० ते २५ वर्षीय तरूणीचा अर्धवट जळालेला मृतदेह सिंदखेडराजा-मेहकर मार्गावरील पिंपळगाव लेंडी शिवारात आढळून आला. या युवतीचा गळा चिरलेला असून, मानेवर व पोटावर जबर मारहाणीच्या खुणा आहेत. तसेच, पोटावर जखमदेखील असून, तिच्या डाव्या पायाच्या पंजाची बोटे छाटलेली आढळून आली. या युवतीच्या चेहर्यावर जळालेला कापड टाकण्यात आला आहे. तिच्या अंगावर काळ्या रंगाचा जळालेला परकर, अर्धवट जळालेला गाऊन होता. त्यामुळे कुणी तरी अज्ञात आरोपीने या युवतीचा निर्घृण खून करून तिचा मृतदेह या परिसरात आणून टाकून जाळण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय निर्माण झाला आहे. आज (दि.३०) सकाळी सिंदखेडराजा शहरापासून १० किलोमीटर अंतरावरील पिंपळगाव लेंडी फाट्यावर ही घटना उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन किनगावराजा पोलिसांसह, वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळाच्या जवळच राहणारी एक महिला सकाळी सात वाजता प्रातर्विधीसाठी गेली असता, तिला हा मृतदेह आढळून आला. भेदरलेल्या महिलेने परिसरातील अन्य लोकांना याची माहिती दिली. पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी परिसर सील करून प्राथमिक तपास केला व मृतदेह ताब्यात घेतला. अंढेरा पोलिस ठाणेहद्दीतील असोला शिवारातदेखील अशाच प्रकारे एका युवतीला जाळण्यात आले होते. त्या घटनेचा तपास लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व अंढेरा पोलिस यांना अद्याप यश आलेले नाही. त्यानंतर पुन्हा एकदा तशीच घटना उघडकीस आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. दरम्यान, मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर मारेकर्याने आधी या युवतीचा गळा चिरला, त्यानंतर डाव्या पायाची बोटे छाटली, व नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, किनगावराजा पोलिस तपास करत आहेत.
सिंदखेडराजा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला सिंदखेडराजा-मेहकर मार्गावरील पिंपळगाव लेंडी शिवारातील गट नंबर १५२ मधील द्वारका सुभाष गायकी यांच्या जुन्या पडक्या शेतातील खोलीमागे दि.३० मेरोजी मध्यरात्री १ वाजता एक अनोळखी महिलेचा अर्धवट जळलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. मृत महिला ही गोर्या रंगाची असून, अर्धनग्न स्थितीत तिचा मृतदेह दिसून आला. याबाबत शेलगाव राऊत येथील पोलीस पाटील राहुल चव्हाण यांनी किनगावराजा पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली, माहिती मिळताच किनगावराजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनास्थळी एका २५ वर्षीय महिलेचे अर्धवट जळालेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले. सदर मृत महिलेच्या डाव्या पायाची बोटे छाटलेली आढळून आली. या महिलेंच्या पायाला सहा बोटे असावीत, असा असा पोलिसांचा कयास आहे. मृत महिलेच्या अंगावर जॅकी कंपनीचे कपडे आढळून असून, अज्ञात व्यक्तीने महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पिंपळगाव लेंडी शिवारामध्ये आणून टाकला असावा, असा पोलिसांना संशय आहे. प्रेत उच्चस्तरीय शवविच्छेदन कारवाईसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे पाठवण्यात आले. तेथे मृतदेहाचे शवपरीक्षण करण्यात आले असून, प्राथमिक रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला होता. तसेच तिच्या नातेवाईकांचा शोध सुरू होता.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे, किनगावराजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार विनोद नरवाडे, अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तसेच वरिष्ठ अधिकार्यांनी तपास अधिकार्यांना तपासाबाबत सूचना दिल्यात. पुढील तपास किनगावराजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार विनोद नरवाडे हे करत आहेत. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून, खुनातील गुन्हेगाराचा शोध लावण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे, असोला शिवारातील जळालेल्या महिलेच्या खुनाचा अद्याप उलगडा झाला नसून, एलसीबी व अंढेरा पोलिस त्या खुनाचा तपास लावण्यात अपयशी ठरले असतानाच, आता पुन्हा एकदा तशीच घटना पुढे आल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकलेले आहे.
या घटनेचे वृत्त कळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या संदर्भात माहिती देताना महामुनी यांनी सांगितले, की समोरच राहणार्या एका महिलेने किनगावराजा पोलिसांना याविषयी माहिती दिली. स्थानिक पोलीस अधिकारी विनोद नरवडे यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली. घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेतली. साधारण २० ते २५ वयोगटातील ही महिला असून, तिला आधी ठार मारण्यात आले असावे, व मध्यरात्रीपासून पहाटेच्या दरम्यान तिचा मृतदेह सिंदखेडराजा, किनगाव राजा रस्त्यावरील एका पडक्या धाब्याच्या मागे आणून टाकल्यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.