Head linesSINDKHEDRAJA

निमगाव वायाळ रेतीघाटाचे चार दिवसांत तांत्रिक मोजमाप; रेतीतस्करांचे पितळ उघडे पडणार!

– निमगाव वायाळ रेतीघाटात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, प्रशासनही घटनास्थळी धावले, रात्रभर गुप्तवेशातील पोलिस तैनात
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – निमगाव वायाळ रेतीघाटातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीउत्खनन झाल्याने या रेतीघाटाचे तांत्रिक मोजमाप करण्यात यावे, तसेच त्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्यात यावे, व अवैध रेती उत्खनन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून दंडासह वसुली करण्यात यावी, या मागणीसाठी निमगाव वायाळच्या सरपंचा सौ. शीलाताई रामेश्वर चाटे यांनी आज, दि.२७ मेरोजी रेतीघाटात आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत, सकाळपासून रेतीघाटात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात होता. तसेच, काल रात्रीपासूनच गुप्तवेशातील पोलिसांनी रेतीघाटात पहारा बसविला होता. तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या सूचनेवरून नायब तहसीलदारांनी महसूल अधिकार्‍यांसह रेतीघाटात जाऊन सरपंचांची समजूत काढली, व १ जूनपर्यंत तांत्रिक मोजमाप करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने सरपंच सौ. चाटेताई यांनी आपले आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पोलिस व महसूल प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता.

सविस्तर असे, की सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथील शासकीय रेती घाटातून लाखो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन झाले असून, सदर घाटाचे तांत्रिक मोजमाप करण्यात यावे, तसेच सीसीटीव्ही फुटेज मिळत नसल्याने सरपंच सौ. शीलाताई चाटे यांनी निमगाव वायाळ रेतीघाटात आज, २७ मेरोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. हे आंदोलन रोखण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासन आज सकाळीच रेतीघाटात दाखल झाले. नायब तहसीलदार संदीप बंगाळे, मंडळ अधिकारी मस्के, तलाठी यशवंत घरजाळे, विष्णू थोरात, राहुल देशमुख, आकाश मघाडे कोतवाल यांनी तहसीलदारांचे लेखी पत्र देत, या रेतीघाटाचे १ जूनपर्यंत मोजमाप करण्याचे आश्वासन या पत्राद्वारे दिले आहे. त्यामुळे सरपंचांनी आपले आजचे आत्मदहन आंदोलन स्थगित केले. तर किनगावराजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनोद नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन जायभाये, मिलींद सोनपसारे, सचिन परसुवाले, चालक सवडे, महिला पोलिस कर्मचारी सोनल चव्हाण, अनुराधा दुडीयार यांनी सकाळी सहा वाजेपासून खडकपूर्णा नदीपात्रात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून चोख बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी निमगाव वायाळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


निमगाव वायाळ येथील खडकपूर्णा नदीपात्रात २७ मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा महिला सरपंच सौ. शीलाताई चाटे यांनी दिला होता. मात्र सदर आंदोलनस्थळी सिंदखेडराजाचे तहसीलदार प्रवीण धानोरकर तसेच उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे हे आले नाहीत. त्यामुळे या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा होत होती. तथापि, तहसीलदारांनी नायब तहसीलदारांना घटनास्थळी पाठवले होते. तसेच, पोलिस बंदोबस्तही चांगला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!