Breaking newsHead linesMaharashtraVidharbhaWorld update

सावित्रींच्या लेकी सुस्साट; ‘दहावी’च्या निकालातही मुलींचीच बाजी!

– कोकण विभाग अव्वल, तर नागपूर विभागाचा निकाल तळाला!
– अमरावती विभाग ९५.५८, मुंबई विभाग ९५.८३ तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ९५.१९ टक्के!

पुणे (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च- २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (दि.२७) ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी पेक्षा १.९८ टक्के निकाल जास्त लागला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. यावेळी सचिव अनुराधा ओक, बांगर हेदेखील उपस्थित होते. यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून, नागपूर विभाग मात्र तळाशी आहे. नागपूर विभाग ९४.७३ टक्क्यांसह राज्यातील विभागनिहाय टक्केवारीनुसार सर्वात खाली आहे. दुसरा क्रमांक कोल्हापूर ९७.४५, पुणे ९६.४४ टक्क्यांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे. मुंबई ९५.८३, अमरावती ९५.५८, नाशिक ९५.२८, लातूर ९५.२७, छत्रपती संभाजीनगर ९५.९ टक्के असा विभागनिहाय लागला आहे. या निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९७.२१ टक्के तर मुलांचा निकाल ९४.५६ टक्के लागला आहे. आकडेवारीनुसार, सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. एकूण ७२ विषयांपैकी १८ विषयांचा १०० टक्के लागला आहे.

विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल :
1. https://mahresult.nic.in/
2. https://sscresult.mkcl.org/
3. https://sscresult.mahahsscboard.in/
4. https://results.digilocker.gov.in
5. https://results.digilocker.gov.in
6. https://results.targetpublications.org/

 


विभागनिहाय निकाल (टक्केवारी)
पुणे : ९६.४४ टक्के
नागपूर : ९४.७३ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ९५.१९ टक्के
मुंबई : ९५.८३ टक्के
कोल्हापूर : ९७.४५ टक्के
अमरावती : ९५.५८ टक्के
नाशिक : ९५.२८ टक्के
लातूर : ९५.२७ टक्के
कोकण : ९९.०१ टक्के

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की यंदा परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले. त्यासाठी २७१ भरारी पथके, महिलांची विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती. त्याशिवाय, जिल्हास्तरावर स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती. आठ माध्यमांत ही परीक्षा घेण्यात आली. प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ऑनलाइन घेण्यात आल्याने निकाल लवकर जाहीर करण्यास मदत झाली. मिळाले आहेत. त्यापैकी लातूर मंडळातील १२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.२१ टक्के तर मुले ९४.५६ टक्के एवढे आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २.६५ टक्के जास्त आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दि.१ ते २६ मार्च या कालावधीत ५ हजार ८६ केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केले होते. राज्यातील २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधील १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यामध्ये ८ लाख ५९ हजार ४७८ विद्यार्थ्यांसह ७ लाख ४९ हजार ९११ विद्यार्थिनी आणि ५६ तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांचे अंतर्गत प्रात्यक्षिक आणि मूल्यमापनाचे गुण ओएमआर शीटऐवजी ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या संकेतस्थळावर भरल्याने निकाल सुमारे एक ते दीड आठवडाअगोदर जाहीर करणे मंडळाला शक्य झाले आहे. गुणपडताळणी व छायाप्रतिसाठी दि. २८ मे ते ११ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. तसेच यंदा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट २०२४ आणि मार्च २०२५ मध्ये श्रेणी/ गुण सुधार योजनेअंतर्गत परीक्षा देता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!