‘वळवा’च्या पावसाने शेगाव, खामगाव परिसर झोडपला; वीज कोसळून बालक ठार; काढणीला आलेला शेतमाल, मालमत्तेचीही मोठी हानी!
– खामगाव, मेहकर तालुक्यालाही वादळाचा तडाखा; टीनपत्रे उडाली!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील शेगावसह खामगाव, मेहकर तालुक्यांतील काही भाग तसेच इतरही भागाला वळवाच्या पावसाने रविवारी (दि.२६) चांगलेच झोडपून काढले. विजेच्या कडकडाटासह अचानक आलेल्या वादळी पावसाने चांगलीच धांदल उडाली. दरम्यान, वीज पडून शेगाव येथील बालकाचा मृत्यू झाला. तसेच खामगाव ते मेहकर रोडवरील टेंभुर्णा गावाजवळील रस्तेविकास महामंडळाने लावलेला भलामोठा दिशादर्शक नामफलक कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. दरम्यान, खामगाव, मेहकर तालुक्यातील काही गावांत तुफान वादळाने चांगलाच धुमाकूळ घातला. घरांवरील टीनपत्रे उडाली असून, झाडेही उन्मळून पडली. त्यामुळे बर्याच भागातील वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, वाढत्या उकाड्याने जीवाची रात्रभर काहिली होत होती. या पावसाने शेतीपिकांसह मालमत्तेचीही मोठी हानी झालेली आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढ झाल्याने विशेषतः दुपारच्या वेळी रस्ते निर्मणुष्य होताना दिसत आहेत. अशातच रविवारी सायंकाळदरम्यान शेगाव शहरसह परिसर तसेच खामगाव तालुक्यातील बोरी अडगावसह काही भाग, याबरोबरच जिल्ह्यातील काही भागात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेल्या शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. अंगावर वीज पडल्यामुळे शेगाव येथील वेदांत सुभाष शेगोकार या बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला. खामगाव तालुक्यातील घाणेगाव, पिंपळगावराजा, राहुडसह इतर बहुतांश गावांना चक्री वादळासारख्या जोराच्या वादळाने तडाखा दिला. यामुळे टीनपत्रे उडाली असून, झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. विजेचे खांब उन्मळून पडल्याने व तारा तुटल्याने बरीच गावे अंधारात बुडाली होती. मेहकर तालुक्यातील काही गावांनाही वादळाने चांगलेच घेरले होते. तालुक्यातील देऊळगाव साखरशासह परिसराला वादळाचा जबर तडाखा बसला. या सोसाट्याच्या वादळामुळे अनेक घरावरील टीनपत्रे उडाली तर झाडेही उन्मळून पडली. येथील देशमुख पेट्रोलीअमचे पीओपी कोसळले. वादळामुळे विजेच्या तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. पातुर ते चान्नी व देऊळगाव साखरशा लाईनवर अनेक ठिकाणी कंडक्टर तुटल्याने जवळजवळ चाळीस गावांतील वीजपुरवठा खंडित झाला असून, दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सस्ती सबस्टेशनचे कनिष्ठ अभियंता यांनी सांगितले. वाढते तापमान त्यातच गुल झालेली वीज त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवाची चांगलीच काहिली सुरू होती.
टेंभुर्णा गावातील मोठे होल्डिंग जमीनदोस्त झाल्याने खामगाव-पंढरपूर मार्ग पूर्ण ट्राफिक जाम झाला होता. गावात वादळी वार्यामुळे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अचानक आलेल्या वादळी वार्याने व सोसाट्याच्या वार्याने टेंभुर्णा शिवारातील स्वागत कमान कोसळली होती. तसेच, तुफान वादळी वार्यामुळे खांडवी-पिंपळगावकाळे रस्त्यावरील ३० ते ४० झाडे तुटून पडल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद झाला होता. त्यामुळे प्रवाशासह वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता.
राज्यात ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळत असून, काही ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांसह जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात वादळी वार्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले असून, शेतकर्यांनी उभे केलेले शेडनेट जमीनदोस्त झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही मेघगर्जना वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला, या पावसामुळे शहरातल्या काही भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता. येत्या २४ तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याचकाळात मराठवाड्यातले हवामान प्रामुख्याने कोरडे राहील, धुळे, जळगाव, हिंगोली, नांदेड, अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून, या जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
————–