संत गजाननांच्या दर्शनाचे स्वप्न अधुरे; भीषण अपघातात भाविक ठार, चौघे गंभीर जखमी
– एका भाविक महिलेली प्रकृती चिंताजनक; अकोला येथे उपचार सुरू!
खामगाव (तालुका प्रतिनिधी) – शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील भाविकांचे स्कॉर्पिओ वाहन उलटून झालेल्या भीषण अपघातात एक भाविक जागीच ठार झाले असून, चार भाविक गंभीर जखमी झाले आहेत. चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून ही गाडी पलट्या खात उलटली. आंबेटाकळी – बोरी आडगाव रस्त्यावर रविवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. जखमींवर खामगाव येथे प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना अकोला येथे हलविण्यात आले होते. एका भाविक महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. शेगावनगरी अवघी चाळीस किलोमीटर दूर राहिली असताना, हा अपघात घडल्याने त्यांचे संतदर्शन मात्र अधुरे राहिले आहे.
प्राप्त माहितीनुसार, एमएच ३३ एसी२३६६ ही ‘स्कॉर्पिओ’ गाडी शेगावकडे जात होती. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित झालेली गाडी घटनास्थळी उलटली. यात देवराव रावजी भंडारकर (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीतील त्यांच्या पत्नी सौ. कांता देवराव भंडारकर (वय ५०), जयदेव नामदेव नाकाडू (वय ४०), जयश्री राऊत (वय १६), समृद्धी कोमलवार (वय ६) सर्व राहणार तळेगाव, ता. कुरणखेड, जि. गडचिरोली असे चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना खामगाव सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात हलविण्यात आले.
अपघातग्रस्त या भाविकांचे संत गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी शेगावला येण्याचे नियोजन होते. मात्र, शेगावनगरी सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर असताना त्यांना घेऊन जाणारे वाहन चालकाच्या डुलकीने अपघातग्रस्त झाल्याने त्यांचे हे नियोजन दुर्देवी घटनेत बदलले. त्यामुळे दर्शनाचा त्यांचा बेत हुकला आणि भलतेच होऊन बसले. अपघातानंतर नजीकच्या ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच, अपघाताची माहिती प्राप्त होताच, खामगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठत बचावकार्य सुरू केले. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने या अपघातातील जखमींना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, भाविक महिलांची चिंताजनक प्रकृती पाहाता, अकोला येथील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले होते. पुढील तपास खामगाव पोलिस करत आहेत.