Breaking newsBuldanaBULDHANACrimeHead linesMEHAKARVidharbha

‘मेहकर’चा ‘बिहार’ झाला! रेतीमाफियांकडून तहसीलदारांवर हल्ल्याचा प्रयत्न!

– मेहकर पोलिसांत तिघांविरोधात गुन्हे दाखल; तीनही आरोपी फरार!

मेहकर (सादिक कुरेशी) – मेहकरचा अक्षरशः बिहार झाल्याचे धक्कादायक वास्तव चव्हाट्यावर आले आहे. रेतीतस्करांवर धडक कारवाया करून त्यांच्या नाकीनऊ आणणारे तहसीलदार नीलेश मडके यांचा तीन दिवसांपासून पाठलाग करणारे रेतीतस्कर त्यांच्या शासकीय निवासस्थापर्यंत पोहोचले असून, शनिवारी (दि.२५) त्यांच्यावर घरीच हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, तहसीलदार बालंबाल बचावले आहेत. या प्रकरणी तीन आरोपींविरोधात मेहकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीनही आरोपी पसार झालेले आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
मेहकरमध्ये तहसीलदारांनी वाळूतस्करांचे कंबरडे मोडले. धडाकेबाज कारवाया.

अवैध रेती वाहतुकीला आळा बसावा म्हणून तहसीलदार नीलेश मडके हे मागील काही दिवसापासून अ‍ॅक्शन मोडवर आहेत. दररोज होणारी रेती वाहतुकीची परवानगी तपासणी, रेतीचा ट्रक कोठून कुठे चालला याची चौकशी करणे सुरू असल्यामुळे अवैधरित्या रेती वाहतूक करणार्‍या तस्करांना रेतीची वाहतूक करता येत नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून तहसीलदार मडके यांच्या निवासस्थानासमोर काहीजण रेकी करत असल्याचे लक्षात आल्यावर विचारपूस केली असता, तुम्ही आमच्या रेतीच्या गाड्या पोलीस स्टेशनला का लावता, म्हणत तहसीलदारांशी हज्जत घालून दबाव आणण्याचा प्रकार समोर आला आहे. तहसीलदार मडके हे मागील एक दोन आठवड्यापासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, तहसील कार्यालयातील स्टाफसह अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करीत आहेत. अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणारी काही वाहने पोलीस स्टेशनला लावण्यात आली असून, रेतीसाठाही जप्त करण्यात आलेला आहे.
शुक्रवारी सकाळी तहसीलदार नीलेश मडके यांच्या पत्नीने फोनकरून माहिती दिली की, एक अनोळखी इसम हा आपल्या शासकीय निवासस्थानासमोर चक्करा मारत आहे. त्या कारणाने तहसीलदार मडके यांनी घरासमोर येवून पाहिले असता, त्यांना अनोळखी इसम घरासमोर उभा दिसला. सदरचा इसम हा नेहमी पाठलाग करणारा असल्याचे लक्षात आल्याने त्याला त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नांव गजानन मनोहर इंगळे असे सांगितले. तसेच त्याला विचारणा केली, तू इथे काय करतो? तू माझा दोन ते तीन दिवसांपासून पाठलाग करित आहे. त्यावर सदर इसम म्हणाला, की तुम्ही रेतीच्या गाड्या पोलीस स्टेशनला का लावल्या, असे म्हणून तहसीलदारांसोबत हुज्जत घातली व हल्ल्याचा प्रयत्न केला. तसेच, तहसीलदार मडके हे आपले बोलणे आटोपून आपल्या निवासस्थानी जात असताना गेटमधून आत जाण्यास सदर इसमाने अटकाव केला व हल्ल्याचाही प्रयत्न केला. या घटनेबाबत लेखी तक्रारीवरून मेहकर पोलीस स्टेशन येथे आरोपी गजानन मनोहर इंगळे रा. माळीपेठ मेहकर, योगेश राजेंद्र काटकर व मोहन राजेंद्र काटकर राहणार मेहकर त्यांच्याविरुद्ध कलम ३४१/१८६/ ३४ गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास मेहकरचे पोलिस निरीक्षक यांच्या आदेशाने मुख्य जमादार सुरेश काळे हे करत आहेत. हे तीनही आरोपी हे फरार झाले असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!