Breaking newsHead linesMaharashtraMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

शिवसेनेची ‘मशाल’ यांच्या बुडाला अशी लावा, की हे पुन्हा महाराष्ट्रात येता कामा नये; उद्धव ठाकरे कडाडले!

– डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल, तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही : मल्लिकार्जुन खारगे
– हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही : शरद पवार
– नरेंद्र मोदींचे हुकूमशाही सरकार उखडून टाकण्याचा जनतेचा संकल्प : नाना पटोले
– मुंबईतील सभा नरेंद्र मोदींची शेवटची सभा; ४ तारखेला संपूर्ण देश डिमोदीनेशन करणार : उद्धव ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे
मुंबई (खास प्रतिनिधी) – हा महाराष्ट्र भोळाभाबडा आहे, पण मूर्ख नाही. कुणी प्रेमाने आलिंगन दिले तर प्रेमाने आलिंगन देणार. पण जर कुणी पाठीत वार केला तर हा महाराष्ट्र त्याचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही. या २० तारखेला जेथे जेथे शिवसेनेची मशाल आहे, ती मशाल यांच्या बुडाला अशी लावा की हे पुन्हा महाराष्ट्रात येता कामा नये, असा घणाघात शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटावर केला. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलामधील एमएमआरडीए मैदानावर शुक्रवारी महाविकास आघाडीची विराट अशी सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसह भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांना अक्षरशः झोडपून काढले. हा महाराष्ट्र तुम्हाला इथल्या मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत ठाकरे यांनी मोदींना आव्हान दिले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले. परंतु हिंदुस्थानची जनता रशिया, बांग्लादेश, पाकिस्तानसारखी परिस्थिती होऊ देणार नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान कोणत्याही परिस्थितीत अबाधित ठेवू. भाजपा, आरएसएस व नरेंद्र मोदींनी लाख प्रयत्न केले तरी ते संविधानाला हात लावू शकणार नाहीत, बदलू शकणार नाहीत आणि तसे प्रयत्न केले तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही, अशा इशारा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांनी दिला.  

या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, AICC चे सचिव आशिष दुआ, बी. एम. संदीप, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, शिवसेना खासदार संजय राऊत, तुषार गांधी आदी उपस्थित होते. बीकेसी मैदानावर इंडिया महाविकास आघाडीच्या परिवर्तन सभेत बोलताना खारगे म्हणाले, की नरेंद्र मोदी नेहमी प्रश्न विचारतात की, ७० वर्षात काँग्रेसने काय केले? काँग्रेसने लोकशाही व संविधान वाचवले नसते तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान कधीच झाले नसते. मोदींची गॅरंटी खोटे बोलणे आहे. १५ लाख रुपये देणार, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु असे म्हणाले पण मोदींनी यातील काहीही केले नाही. काँग्रेस आघाडीचे सरकार आले तर तुमच्या दोन एकर जमिनीतून तर एक एकर जमीन मुस्लीमांना देतील, दोन म्हशी असतील तर त्यातील एक म्हैस मुस्लीमांना देतील ही पंतप्रधानाची भाषा आहे का? ज्या दिवशी मुस्लीमांच्या विरोधात बोलेन त्या दिवशी सार्वजनिक जिवनातून निवृत्त होईन म्हणाले व दुसऱ्याच दिवशी हिंदू मुस्लीमावरच बोलले. नरेंद्र मोदी एससी, एसटी, मागास समाजाला काहीही देऊ इच्छित नाहीत. ३० लाख सरकारी पदे रिक्त आहेत पण मोदींनी जागा भरल्या नाहीत. महागाई, बेरोजगारीवर बोलत नाहीत. नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत तर इंडिया आघाडी ३०० जागा जिंकून सत्तेत येईल असा विश्वासही खर्गे यांनी व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी विचाराने सोबत नसलेल्यांना जेलमध्ये टाकले आहे. विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना मोदींनी जेलमध्ये टाकले. बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना कठीणवेळी मदत केली त्याचा त्यांना विसर पडला आहे. यावेळची लढाई ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवण्याची आहे. भटकती आत्मा अशी टीका केलेल्या नरेंद्र मोदींना सडतोड उत्तर देत शरद पवार म्हणाले की, हा आत्मा तुम्हाला सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र हा शाहु, फुले, आंबेडकरांचा आहे, तो मोदीशाह यांचा होऊ देणार नाही. भाजपाने ४०० पारचा नारा दिला, आपण अब की बार भाजपा तडीपारचा नारा दिला आणि मग भाजपा गप्प झाले, त्यानंतर त्यांनी घराणेशाहीचा मुद्दा काढला. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून लोक मृत्यूमुखी पडले त्याच रस्त्यावरून नरेंद्र मोदींनी वाजत गाजत रोड शो केला.शिवसेनेने भाजपाला कठीण काळात मदत केली त्या शिवसेनेला नकली म्हणता. १० वर्षात मोदींनी काय केले, प्रचारात ते सारखे हिंदू मुस्लीम, हिंदू मुस्लीम करत आहेत. कधी घुसखोर म्हणता, देशद्रोही ठरवता. देशाचे स्वातंत्र अबाधित ठेवण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र आली आहे. ज्या प्रमाणे मोदींनी नोटबंदी जाहीर करुन त्या रात्रीपासून ५०० व १००० रुपयांच्या नोटांचे संपवल्या तसेच नरेंद्र मोदी हे शेवटचे मुंबईत आले आहेत, ४ तारखेला संपूर्ण देश डिमोदीनेशन केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधान देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले ते हळूहळू संपवण्याचे काम भाजपा करत आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचा नरेंद्र मोदी सामना करु शकत नाहीत, हरवू शकत नाही म्हणून खोटी तक्रार करुन जेलमध्ये टाकले. गरीब मुलांना चांगले शिक्षण व आरोग्याची सुविधा उपलब्ध केली हेच मोदींना नको आहे त्यासाठीच मला अटक करण्यात आली. २ तारखेला पुन्हा जेलमध्ये जावे लागणार आहे पण इंडिया आघाडीचे सरकार आले तर मात्र जेलमध्ये जावे लागणार आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी सर्व विरोधकांना एक तर जेलमध्ये टाकले किंवा त्यांना संपवले. नरेंद्र मोदी भारतातील विरोधकांना जेलमध्ये टाकत आहेत. बांग्लादेशातही तेच चालले आहे. पाकिस्तानतही तेच चालले आहे, मोदी सुद्धा भारताला पाकिस्तान, बांग्लादेश बनवू पहात आहेत. मोदी सरकार पुन्हा आले तर ठाकरे, शरद पवार, प्रियंका गांधी सर्व विरोधी नेत्यांना जेलमध्ये टाकले जाईल, अशी भिती केजरीवाल यांनी व्यक्त केली.


यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की,मोदींना पर्याय कोण, हा प्रश्न विचारला जातो पण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा काढली व त्यानंतर मणिपूरमधून पदयात्रा काढली व १० हजार किलोमीटरच्या या पदयात्रेने देशातील वातावरण बदलून टाकले. निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात सभावर सभा घेतल्या. मोदींनी १० वर्षात काय केले हे सांगत नाहीत, राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत पण मोदींनी शेतकऱ्यांबद्दल एक शब्द काढला नाही. राज्यातील उद्योग गुजरातला नेऊन तरुणांना बेरोजगार केले. नरेंद्र मोदींना खुर्चीची चिंता आहे. जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे, ४ जूनला मोदी सरकार जाणार आहे कारण नरेंद्र मोदींचे हुकूमशाही सरकार उखडून टाकण्याचा संकल्प जनतेनेच केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!