सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील निमगाव वायाळ येथील ईश्वर किराणा दुकानास आज (दि.16) सकाळी भीषण आग लागून या आगीत किराणा दुकानातील लाखो रूपये किंमतीचा किराणा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाला. या घटनेत किराणा दुकानदार जखमी झाले आहेत. सदर आग शॉटसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, या अग्नितांडवात दुकानातील साहित्य व घरगुती सामानाचे जवळपास दोन लाखांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
दुकानातील विद्युत वितरण वायरमध्ये शॉटसर्किटने ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या शॉटसर्किटने दुकानातील कपड्यांनी पेट घेतल्याने दुकानातून आगीचे लोट बाहेर पडले. या वेळी दुकानदार दलसिंग मानसिंग देव्हरे यांच्या कपड्यांनी पेट घेतल्याने ते दुकानाबाहेर पळाल्याने गावातील नागरिकानी त्यांच्या अंगावरील आग विझवून त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी खाजगी दवाखान्यात भरती केले. यावेळी उपस्थित नागरिकानी दूकानातील आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणली, मात्र या आगीच्या भक्ष्यस्थानी किराणा दुकानातील गोडेतेल, साखर, चिपचे पुडे, बिस्किटे व कोल्डड्रिंक्स व फ्रिज जळून खाक झाले आहे. तसेच घरगुती सामनामध्ये कांदे व मोठ्या प्रमाणात आंबे जळून खाक झाले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच निमगाव वायाळचे तलाठी विष्णू थोरात यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला आहे.
निमगाव वायाळ येथे महावितरण कंपनीने एक महिन्यापूर्वी गावामध्ये केबल टाकल्यापासून गावातील विद्युत प्रवाह हा कमी जास्त दाबामध्ये प्रवाह होत असल्याने शॉर्टसर्किटचे प्रमाण वाढले आहे. याबाबत महावितरणकडे अनेकवेळा तोंडी व लेखी तक्रार करूनही काहीच फायदा झाला नाही. स्थानिक लाईनमन हा मुख्यालयी हजर राहत नसल्याने असे प्रकार घडत असल्याची चर्चा परिसरात जोर धरत असल्याने संबंधित लाईनमनवर तात्काळ कार्यवाही करावी, अशी जनतेची मागणी आहे.