साखरखेर्ड्यात पाणी पेटले!; दोन दिवसात वार्ड क्रमांक एकमध्ये पाणीपुरवठा न झाल्यास सदस्यपदाचा राजीनामा!
– शिक्षक कॉलनीसह अनिकेत सैनिक स्कूल परिसरातील रहिवाशांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
– पाणी जिरते कुठे? दिवाळीत पाणी देणार होते, अक्षयतृतीया गेली तरी पाणी मिळालेच नाही!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – कोराडी प्रकल्पावरुन पुरेसे पाणी उपलब्ध होत असूनही येथील वार्ड क्रमांक एकमधील शिक्षक कॉलनी तथा अनिकेत सैनिक स्कूल परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ही समस्या चार वर्षांपासून भेडसावत असल्याने ग्रामपंचायत प्रशासन मूग गिळून बसले असून, तमाशा पाहात आहे. दोन दिवसात पाणीपुरवठा न झाल्यास ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती माजी उपसरपंच आयुबसेठ कुरेशी यांनी दिली आहे. साखरखेर्ड्याचे पाणी चांगलेच पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
साखरखेर्डा गावची लोकसंख्या २५ हजार असून, या गावांसाठी तीन जलकुंभ उभारण्यात आले आहे. नवीन जलकुंभाचे काम चार वर्षांपूर्वी रविंद्र पाटील यांच्या पेट्रोलपंपाच्या जागेत स्थापीत झाले. वार्ड क्रमांक एकसाठी पाणीपुरवठा व्हावा म्हणून माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी सात कोटींचा निधी मंजूर करुन दिला होता. त्यात पाईपलाईन, जलकुंभ, नवीन मोटारपंप, वितरण व्यवस्था ही कामे शिक्षक कॉलनी आणि परिसरात झाली, पण पाणी आलेच नाही. पिण्याचे पाणी १५ रुपये प्रति कॅन विकत घ्यावे लागत असून, बोअरवेल आटल्याने ५०० रुपये प्रति टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. कोराडी धरणावरून केलेली नळपाणी पुरवठा योजना दुरुस्त करून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा भरघोस निधी जलजीवन मिशन अंतर्गत साखरखेर्डा गावांसाठी आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मंजूर केला होता. या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी पाणी पुरविण्याच्या नावाखाली मागील तीन महिन्यांपासून नुसते पाइपलाईन शोधण्याच्या नावाखाली खड्डेच खोदणे सुरू आहे. हे खड्डे पाणी पुरविण्याऐवजी अपघातास निमंत्रण देत आहेत. त्यामुळे येणार येणार म्हणून पिण्याच्या पाण्याची आतुरतेने वाट पाहणार्या येथील शिक्षक कॉलनीसह अनिकेत सैनिक स्कूल परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. ग्रामपंचायत प्रशासन मात्र या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्याबाबत उदासीन आणि सुस्त दिसत असून, देणार देणार म्हणून अगदी दिवाळीच्या पाडव्यापासून येथील नागरिकांना पिण्याचे शुध्द फिल्टरचे पाणी पुरविण्याचे आश्वासन देणार्या येथील ग्रामपंचायत पदाधिकारी तथा प्रशासनाने गुढीपाडवा होऊन अक्षय तृतीया उजाडली तरी पिण्याचे पाणी पुरविण्याबाबत असमर्थ दिसून आली.
साखरखेर्डा येथे कोराडी धरणावरून पाणी पुरवठा करणार्या कोराडी धरणात पुरेसे पाणी असूनही गावातील गावाच्या दक्षिणेकडील शिक्षक कॉलनीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी चातकासारखी वाट पहावी लागत आहे. योजना कुठे कुठे दुरूस्ती केली गेली व दुरूस्ती झाली असेल तर पाणी कुठपर्यंत आले, पाणी कुठे कुठे मुरत आहे याची माहिती सर्व सामान्य जनमाणसातून विचारली जात आहे. पाणीपुरवठा योजना दुरूस्ती करून पाणी जलशुद्धीकरण केंद्रात येऊन सुमारे महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला. पण तेथून पुढे पाणी कुठे कुठे जाते व शिक्षक कॉलनीतील नागरिकांपर्यंत कां पोहोचत नाही, याचा शोध जिल्हाधिकारी यांनीच घेण्याची वेळ आली आहे. पाणी साठविण्यासाठी येथील किल्यावर ४ लाख लीटर क्षमतेचा, पलसिध्द मठाजवळ ३.५० लाख लीटर क्षमतेचा एक व शेंदूर्जन रोडवरील पंपाजवळ ३ लाख लीटर क्षमतेचा तिसरा असे तीन जलकुंभ उभे राहिले आहेत. शिक्षक कॉलनीतील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी ४ वर्षांपूर्वीच शेंदूर्जन रोडवरील हा तिसरा विशेष जलकुंभ बांधण्यात आला आहे. पण सदोष वितरण प्रणालीमुळे या तिसर्या जलकुंभापर्यंत पाणी पोहोचत नसल्याचे चित्र आहे. शिक्षक कॉलनीत नळयोजना पूर्ण करून जवळपास ३ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र यंत्रणेतील दोषांमुळे हा जलकुंभापर्यंत अजूनपर्यंत पाणीच पोहोचलेले नसल्याचे विचित्र चित्र असल्याने नागरिकांना पाणी टंचाईच्या कठीण समस्येला तोंड द्यावे लागत आहे. विशेष बाब म्हणजे, शिक्षक कॉलनीतील नागरिकांकडून पाणीकरांसह इतर नियमित करभरणा घेतला जात असून, सर्वात जास्त करभरणा या भागातील नागरिकांकडून केला जातो. मात्र नियमित कर भरणा करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने या भागातील रस्ते , वीज , पाणी आदी सोयी सुविधांकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे. या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी संबंधित प्रशासनाकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे. आता पाण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा भागातील त्रस्त नागरिकांनी दिला आहे.
आठ दिवसातच नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात येईल, असे ठोस आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने देऊन २ महिने झाले पण पाणी पुरवठ्याच्या नावाखाली कंत्राटदार यांचे अपघातास निमंत्रण देणारे खड्डेच खोदणे स्ाुरू आहे. जिल्हा प्रशासनाने कोट्यवधी निधी नेमका कुठे खर्च करण्यात आला यांचा शोध घेणे गरजेचे आहे.
– अशोक पाटील, नागरिक, शिक्षक कॉलनी, साखरखेर्डा.
***
शिक्षक कॉलनी आणि वार्ड क्रमांक एकमधील भागातील नागरिकांना दोन दिवसात पाणीपुरवठा न झाल्यास ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देऊन आपण आंदोलन करणार आहे.
– आयुबसेठ कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य, वार्ड क्रमांक एक