अंढेरा गावाजवळील पुलावरील खड्डा देतोय अपघाताला निमंत्रण; बांधकाम विभागा कुणाचा जीव जायाची वाट पाहतोय?
अंढेरा (हनिफ शेख) – मलकापूर पांगरा ते अंढेरा या रस्त्यावरील अंढेरागावाजवळ असलेल्या पुलावर जीवघेणा खड्डा निर्माण झाला असून, एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता आहे. ठेकेदाराने रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याने हा खड्डा निर्माण झाला आहे. हा खड्डा तातडीने भरून या पुलावरील सीलकोटचे काम पूर्ण करावे, अन्यथा एखादा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या खड्ड्याकडे दुर्लक्ष करून कुणाचा जीव जायाची वाट पाहात आहे, का असा संतप्त सवाल निर्माण झाला आहे.
सविस्तर असे, की मलकापूर पांगरा ते अंढेरा या १६ किलोमीटर रस्त्यावर अंढेरा फाटा ते अंढेरा गावादरम्यानच्या रस्त्याचे काम गेल्या १८ ते २० महिन्यापूर्वी रुंदीकरण व डांबरीकरण हे पूर्ण झाले. मात्र गावाजवळील संतोष सानप पाटील यांच्या घराजवळील तो पूल बाकी असल्याने त्या पूलावरील खडीकरण व डांबरीकरण हे तसेच राहिले होते. पुलाचे पूर्ण काम झाल्यावर त्या पुलावर कंत्राटदाराने खडीकरण व डांबरीकरणाचा पहिला कोट पूर्ण करून ते तेवढेच अर्धवट सोडले. त्यावरील असलेला शिलकोट न करता तो रस्ता रहदारील सुरुच ठेवला व कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग देऊळगावराजा यांच्या दुर्लक्षितपणामुळे त्या पुलाजवळील खडीकरण हे रहदारीमुळे उखडून तेथे मोठा खड्डा पडला आहे. तो खड्डा दोन्ही बाजूला निमुळता रस्ता असल्याने येणारे जाणारे वाहन त्या खड्ड्यांमध्ये व दुचाकी वाहनधारक येऊन आदळतात.
ओव्हरटेकच्या नादामध्ये एखाद्या वेळेस या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे घडल्यास एखाद्याचा अपघात होऊ शकतो. त्यामुळे संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या पुलावरील अर्धवट स्थितीत सोडलेल्या शेवटचा सील कोट करावा, व वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत करावा, अन्यथा एखाद्या वाहनधारकाला जीव गमावा लागेल, अशी मागणी प्रवासी वर्गांमधून होत आहे.