– हभप. सारंगधर टेके महाराज यांचा स्तुत्य उपक्रम
बिबी (ऋषी दंदाले) – येथील संत श्री गजानन महाराज संस्थान येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी बालसंस्कार व सांस्कृतिक शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. संस्थानचे संस्थापक अध्यक्ष हभप. सारंगधर महाराज टेके यांच्यावतीने गेल्या १९ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. आजपासून सुरू झालेल्या या शिबिरात परिसरातील ८२ बालके सहभागी झालेली आहेत.
येथील संत गजानन महाराज मंदीर येथे आज (दि.११) पासून या शिबिरास सुरूवात झाली. शिबिरामध्ये लहान बालगोपाळांना विविध धार्मिक, अध्यात्मिक मूल्यांची शिकवण दिली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सारंगधर महाराज टेके यांनी हा सुंदर उपक्रम १९ वर्षापासून सातत्याने चालवत आणलेला असून, यामध्ये लहान बाळगोपाळांना संस्काराचे धडे देणे व वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार म्हणून हरिपाठ, कीर्तन, मृदंग, प्रवचन इत्यादी भागवत धर्माच्या प्रचारार्थ बालगोपालांना शिकवले जाते. त्यासाठी मुलांकडून कोणत्याही प्रकारची फी घेतली जात नाही. मुलांसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था व जेवण्याची सर्व व्यवस्था संस्थांच्यावतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने केली जाते. या बाल संस्कार शिबिराचे सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार तोताराम कायंदे यांच्याहस्ते ग्रंथपूजन, वारकरी साहित्य टाळ, मृदंग, वीणा, पेटी, तबला यांच्या पूजनाने झाली. याप्रसंगी बिबी परिसरातील पत्रकार देवानंद सानप, बबनराव बनकर माजी सरपंच बिबी, छायाताई बगडिया माजी सरपंच बिबी, विदर्भ रत्न ह.भ.प. अनिल महाराज चेके, विजय महाराज गव्हाणे, राजेंद्र महाराज बोरुडे व शिबिराचे नियोजन करणारे गोपाल महाराज टेके व परिसरातील सर्व भाविक भक्त उपस्थित होते.