– चांगले पोहणार्या मुलाचा मृत्यू कसा झाला?; वर्हाडातील लोकांनी तोंड बंद का ठेवले?
चिखली (महेंद्र हिवाळी) – तालुक्यातील खोर येथे वर्हाडासोबत लग्नासाठी आलेल्या मेहुणाराजा (ता.देऊळगावराजा) येथील अवघ्या २१ वर्षीय युवकाचा खोरच्या पाझर तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. पाझर तलावात पोहोण्यासाठी उतरला असता तो वर आला नाही. लग्नाचे वर्हाड घरी गेले तरी हा युवक परत कसा आला नाही, म्हणून त्याचा शोध घेतला असता, तो तलावात बुडाल्याचे लक्षात आले. अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी येथील एक्स्पर्टनी पाण्यात उतरून या मुलाचा शोध घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला. काल रात्री याप्रकरणी रायपूर पोलिसांत नोंद करण्यात आली, व उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्देवी घटनेने मेहुणाराजा गावावर शोककळा पसरली होती. दरम्यान, लोकांतील चर्चेनुसार, हा मुलगा चांगला पोहणारा होता. तो पाण्यात बुडालाच कसा?, तसेच तो बुडाल्याची माहिती वर्हाडातील लोकांनी पोलिसांना वेळीच का दिली नाही?, याबाबत शंकाकुशंका निर्माण झाल्या असून, या मृत्यूची पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मेहुणाराजा येथील एक लग्न खोर येथे लागण्यासाठी आले होते. त्यात अमर विज्ञान काकडे (वय २१, रा. मेहुणाराजा, ता. देऊळगावराजा) या युवकाचाही समावेश होता. ९ मेरोजी हे लग्न आले असताना हा युवक काही जणांसोबत खोरच्या पाझर तलावात पोहोण्यासाठी गेला होता. पाण्यात उतरल्यानंतर तो वर परत आलाच नाही. याप्रकरणी सोबतच्या लोकांनी काहीही वाच्यता केली नाही. लग्नाचे वर्हाड मेहुणाराजा येथे परत गेले असता, काकडे कुटुंबीयांनी मुलगा परत का आला नाही, म्हणून विचारपूस केली. परंतु, त्यांना कुणी काहीच सांगितले नाही. त्यामुळे मुलाचे वडिल विज्ञान त्र्यंबक काकडे (वय ४८, रा. मेहुणाराजा) हे काही नातेवाईकांसह खोर येथे गेले असता, त्यांना हा दुर्देवी प्रकार तेथे कळला. लोकांच्या चर्चेतून अमर काकडे हा पाझर तलावात बुडून मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी एकच हंंबरडा फोडला. याबाबत त्यांनी रायपूर पोलिस ठाणे येथे माहिती दिली असता, पोलिसांनी तातडीने खोर येथे धाव घेतली.
या पाझर तलावातून मृतदेह बाहेर काढणे कठीण असल्याने पोलिसांनी अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी येथील मानवसेवा सामाजिक कार्य व आपत्ती व्यवस्थाप फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना मदतीसाठी बोलावले. हे कार्यकर्ते पोहण्यातील एक्स्पर्ट मानले जातात. त्यांनी अथक शोधाशोध करून मृतक अमर काकडे याचा मृतदेह शोधून पाझर तलावातून बाहेर काढला. याबाबत मुलाचे वडील विज्ञान काकडे यांच्या तोंडी फिर्यादीवरून रायपूर पोलिसांनी अकस्माक मृत्यूची नोंद घेतली असून, पुढील तपास जमादार ऋषीकेश पालवे हे करत आहेत. बुडून मृत्युमुखी पडलेला मुलगा हा चांगला पोहणारा असल्याचे सांगण्यात येत असून, या मुलाचा मृत्यू कसा झाला? याबाबत गावात वेगवेगळ्या चर्चा कानावर येत होत्या. हा मृत्यू संशयास्पद असल्याचे लोकांच्या चर्चेतून जाणवते आहे. पोलिसांनी सखोल तपास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
———-