मृत्यूचा सापळा बनलेल्या समृद्धी महामार्गावर आता दरोडेखोरांचा सुळसुळाट!
– समृद्धी महामार्गाची सुरक्षा धोक्यात; महामार्ग पोलिस झोपा काढतात का? : प्रवाशांचा सवाल
बिबी (ऋषी दंदाले) – सतत गाडी चालवून थकवा आल्याने क्षणभर विश्रांती म्हणून एका पेट्रोल पंपावर थांबलेल्या चारचाकीतील कुटुंबाला दरोडेखोरांनी धाकदपट करून लुटल्याची धक्कादायक घटना समृद्धी महामार्गावर मेहकरनजीक डोणगाव पोलिस ठाणेहद्दीत घडली आहे. हा महामार्ग आधीच मृत्यूचा सापळा बनला असताना, आता दरोडेखोरदेखील सक्रीय झाल्याने महामार्ग पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल रात्री तीन वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी सकाळी डोणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
सविस्तर असे, की समृद्धी महामार्गाने एक कुटुंब आपल्या कारने (क्रमांक MH 12 JC 1919) मुंबईकडे जात होते. या प्रवासादरम्यान मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास कारचालकाला डुलकी लागत असल्याने त्यांनी काही वेळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी मेहकरजवळील डोणगावहद्दीत एका पेट्रोलपंपाजवळ गाडी लावून विश्रांती घेतली. यावेळी कारमध्ये एका महिलेसह पाच जण होते. काही वेळानंतर चार अज्ञात व्यक्ती त्या ठिकाणी आले आणि त्यांनी विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कारमधील चौघांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेले दागिने आणि पैसे मागण्यास सुरुवात केली. जीव जाण्याच्या भीतीपोटी नाईलाजाने त्यांनी त्यांच्याजवळ असलेले दागिने, laptop, आणि रोख रक्कम असा जवळपास 1.65 लाखांचा मुद्देमाल त्या दरोडेखोरांना दिला गेला. पैसे व दागिने घेऊन हे दरोडेखोर पसार झालेत.
या घटनेने समृद्धी महामार्गाची सुरक्षा धोक्यात आली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आतापर्यंत समृद्धी महामार्गावर शेकडो अपघात झाले असून, शेकडो बळी गेले आहेत, तर हजारो जायबंदी झाले आहेत. राज्यातील सर्वाधिक धोकादायक महामार्ग म्हणून या मार्गाची ओळख निर्माण झाली असताना, आता दरोडेखोरदेखील या महामार्गावर सक्रीय झाल्याने प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. डोणगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून, पोलिस दरोडेखोरांचा कसून तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
डोणगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार नागरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री (दि.९मे) डोणगावहद्दीतील पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी उभ्या असलेल्या एका कारवर हल्ला करून कारमध्ये असलेल्या युवकांकडून दोन लॅपटॉप, खिशातील रोख रक्कम असा एकूण एक लाख ६५ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. फिर्यादींच्या तक्रारीवरून आज (दि.१०) सकाळी डोणगाव पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
टायर चेक पॉइंट झाले बंद!
समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा ओलांडल्याने टायर फुटून मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. हे अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारने आरटीओंना टायर चेक पॉइंट तयार करून वाहनांचे टायर चेक करण्याचे आदेश दिले होते. चांगले टायर असतील तरच महामार्गावर वाहनांना प्रवेश होता. परंतु, आता हे टायर चेक पॉइंटदेखील बंद पडलेले आहेत. तसेच, महामार्गावरील रात्रीची पेट्रोलिंगदेखील बंद झाली असून, महामार्ग पोलिस झोपा काढतात काय, असा सवाल निर्माण झाला आहे.
————-