राज्य महामार्गाचा होणार कायापालट; अमडापूर ते दुसरबीड ५४ किलोमीटरसाठी १९० कोटी मंजूर!
– साखरखेर्डा, दुसरबीड, शेंदुर्जन, सिंदखेडराजा ही गावे येणार प्रमुख ‘कनेक्टिव्हीटी’त!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – अमडापूर ते दुसरबीड या २२२ राज्य महामार्गाचे विस्तारीकरण करण्यासाठी ५४ किलोमीटरच्या मार्गासाठी १९० कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याची माहिती या विभागाचे आमदार तथा माजीमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मस्थानापासून थेट शेगाव येथील श्री संत गजानन महाराज या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्यासाठी हा मार्ग सुकर होईल, या दृष्टिकोनातून या रस्त्याचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी संबंधित विभागाला दिले होते. शेगाव, अमडापूर, साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा आणि दुसरबीडजवळील समृद्धी महामार्गाला जोडणारा हा महामार्ग महाराष्ट्र स्टेट ईन्ट्रक्चर डेव्हलपमेंट कोऑपरेशन (एमएसआयडीसी) या योजनेतून मंजूर करण्यात आला आहे. साखरखेर्डा येथील महास्वामी श्री पलसिध्द महाराज, श्री प्रल्हाद महाराज रामदासी या तीर्थक्षेत्र गावाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आणि मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूर जिल्ह्यातील भाविकांना जिजाऊ माँसाहेबांचा ऐतिहासिक राजवाडा, जन्मस्थळाचे दर्शन तेथून साखरखेर्डा येथील १ हजार वर्षांपूर्वीचा श्री पलसिध्द महास्वामी मठ, श्री प्रल्हाद महाराज संस्थान यांना भेट देऊन संत योगीराज श्री गजानन महाराज शेगाव येथे जाण्यासाठी हा प्रशस्त महामार्ग होऊ घातला आहे. प्रसिद्ध हिवरा आश्रम हे स्थळदेखील यानिमित्ताने प्रमुख कनेक्टिव्हिटीमध्ये येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेंदुर्जन येथे महानुभाव पंथांची काशी म्हणून भव्य दत्त मंदिर आहे. २२२ हा राज्य महामार्ग समृध्दी महामार्गाला जोडून या महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात यावे, ही मागणी साखरखेर्डावासीयांची होती. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वीच या महामार्गावरील पाहणी अहवाल एका कार्यकारी अभियंत्यांनी सादर केला होता. अखेर या महामार्गावरील प्रशासकीय बाबींची पूर्तता पूर्ण झाली आहे. हा २२२ महामार्ग सिंदखेडराजा मतदारसंघातून जात असल्याने साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, दुसरबीड या गावांना पूनर्वैभव प्राप्त होणार आहे.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या वास्तव्याने पुनित झालेला भूभाग आहे. या मतदारसंघात शेंदुर्जन येथे महानुभावपंथाचे भव्य मंदिर आहे. साखरखेर्डा येथे दोन मोठे तीर्थक्षेत्र आहेत. सिंदखेडराजा येथून किंवा समृद्धी महामार्गाने दुसरबीड येथून सरळ या महामार्गाने प्रवास करता येईल, असा हा २२२ राज्य महामार्ग असेल. यासाठी एमएसआयडीसीमधून १९० कोटींची मंजुरी घेण्यात आली आहे.
– डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार तथा माजीमंत्री, सिंदखेडराजा
—————