महाआघाडीला राज्यात ३० ते ३५ जागा मिळणार; माढा, सातारा, बारामती आम्हीच जिंकणार!
– शरद पवार आणि भाजप नेत्यांत फोनाफोनी – प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट!
सातारा (संकेतराज बने) – केंद्रातील व राज्यातील भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला एक जागा, आम्हाला ४ जागा, एमआयएमला १ जागा, अशा सहा जागा विरोधी पक्षाला मिळाल्या होत्या. परंतु, आताच्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस महाआघाडीला ३० ते ३५हून जागा मिळतील, असे ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे पत्रकारांशी बोलताना ठामपणे सांगितले. लोकांना बदल पाहिजे आहे, आणि काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या विचाराला आणि त्याच बरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला लोकांचे समर्थन मिळेल, असेही पवारांनी यावेळी सांगितले. दरम्यान, शरद पवार आणि भाजपचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भाजप आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली, असा सवालही आंबेडकर यांनी केला आहे. माढा, सातारा व बारामती येथे झालेल्या मतदानाचे निकाल आमच्यासाठी अनुकूल आहेत. या तिन्ही जागांवर आमचे उमेदवार चांगल्या फरकाने निवडून येतील असा ट्रेण्ड आहे, असेही पवारांनी यावेळी ठामपणे सांगितले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी ‘रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे सातारा येथे आले होते. यावेळी त्यांनी सातारा राष्ट्रवादी काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्या या दाव्याने विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील जनता आता काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचाराबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील संघटनेला समर्थन देत आहे. शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज ठाकरे एकत्र येत आहेत, यावर शरद पवार म्हणाले, बघूया काय होतंय ते. मोदींना कोणा-कोणाची मदत हवी आहे, हे यातून दिसते. त्यांचा आत्मविश्वास कुठं गेलाय, हेही समजत आहे, अशी टीका मोदी यांच्यावर केली. अदानी-अंबानी यांनी काँग्रेसला मदत केली, असा भाजपकडून आरोप होत आहे, यावर बोलताना पवार म्हणाले, आतापर्यंत अदानी-अंबानी हे कोणाचे दोस्त आहेत, म्हणून चर्चा होती? आता एकदम उलट, ज्यांच्याबद्दल तक्रार होती, चर्चा होती, आज तेच काँग्रेसवर ढकलायला लागले आहेत. गांधी-नेहरू यांचा विचार आणि भाजप यांचा विचार यात काही साम्य नाही, एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट सांगितले. तुमचा पक्ष नीट चालवा, दुसर्याच्या पक्षात कशाला तोंड घालता? शरद पवारांनी सुनावले.
बारामती, माढा लोकसभा मतदारसंघातील पैसा वाटपाचा आरोप भाजपवर होत आहे, यावर पवार म्हणाले, आजपर्यंत बारामती मतदारसंघात कधीच पैसे वाटप ही संकल्पना नव्हती, ती पहिल्यांदाच पाहिली आणि हे नवीन कल्चर राजकारणात येतंय, याचा विचार करावा लागेल, असेही पवार म्हणाले. देशात पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या टप्प्यातील मतदान मोदींना अस्वस्थ करणारे आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील निवडणूक संपल्यानंतर मोदींनी आपला स्वर बदलला. यानंतर त्यांनी मुस्लीम समाजाचा उघडपणे उल्लेख केला. मोदींना असे वाटत असावे की, धर्मांध विचार घेऊनच मदत होऊ शकते. जसजसे निवडणुकीचे टप्पे पुढे जात आहे, तसेतसे मोदींचे स्थान संकटात जात आहे, अशी भावना भाजप नेत्यांमध्ये असावी, असे माझे निरीक्षण असल्याचे शरद पवार म्हणाले.
————–