बुलढाणा येथील स्त्री रूग्णालयातील नर्सच्या हलगर्जीने घेतला नवजात बालकाचा बळी!
– नातेवाईकांच्या आक्रमक भूमिकेनंतर दोन नर्स तडकाफडकी कार्यमुक्त; चौकशीही सुरू!
चिखली (महेंद्र हिवाळे) – बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रूग्णालयातील नर्सने वेळीच बालरोगतज्ज्ञ डॉक्टरला न बोलावल्यामुळे योग्य त्या वैद्यकीय उपचाराअभावी नवजात बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जिल्हा स्त्री रुग्णालय येथे घडली. याबाबत युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर यांच्यासह महिलेच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेताच, जिल्हा शल्यचिकित्सकांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी संबंधित दोन नर्सला तडकाफडकी कार्यमुक्त केले आहे. मेरा बुद्रूक येथील महिलेच्या बाबतीत हा दुर्देवी प्रकार घडला असून, या घटनेने महिलेचे कुटुंबीय चांगलेच संतप्त झालेले आहेत. विशेष म्हणजे, या बाळाला झटके येत असतानाही संबंधित नर्सने बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांना बोलावले नसल्याने संतप्त नातेवाईकांच्या आक्रोशानंतर दोन नर्स तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आलेल्या आहेत. श्रीमती ममता चव्हाण आणि श्रीमती मनिषा क्षीरसागर अशी या नर्सची नावे आहेत. त्या प्रतिनियुक्तीवर धाडरोजवरील या जिल्हा स्त्री रूग्णालयात कार्यरत होत्या.
सविस्तर असे, की मेरा खुर्द येथील सलमा सदफ या विवाहितेला प्रसुतीसाठी काल दुपारी ग्रामीण रूग्णालय मेरा येथे हलविण्यात आले होते. परंतु, पोटातील बाळाचे ठोके जास्त असल्याने क्रिटीकल केस म्हणून त्यांना तातडीने बुलढाणा येथील स्त्री रूग्णालयात हलविण्याचा सल्ला ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरांना दिला. त्यानुसार, सलमा सदफ यांना बुलढाणा येथे हलविण्यात आले. रात्री दीड वाजता सलमा यांनी बाळाला जन्म दिला. बाळाला झटके येत असल्याचे पाहून बाळाचे वडिल सय्यद शफात यांनी कर्तव्यावर असलेल्या नर्सला याबाबत कल्पना दिली व तातडीने डॉक्टरांना बोलावण्याची विनंती केली. परंतु, संबंधित नर्सने वेळीच स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांना बोलवले नाही. परिणामी, सकाळी पाच वाजेच्या सुमारास बाळ दगावले. या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी आक्रमक रूप धारण केले. स्त्री रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांच्याकडे संबंधित नर्सवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर तातडीने दोन नर्सला कार्यमुक्त करत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगून, चौकशीही करण्याचे आश्वासन दिले. या रूग्णालयात डॉ. योगश शिंदे हे रात्रीच्यावेळी कर्तव्यावर होते. परंतु, ते हजर नसल्याने बाळ दगावल्याचा आरोप नातेवाईक करत असून, त्यांच्यावरही कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे. या दुर्देवी घटनेची माहिती नातेवाईकांनी युवासेनेचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर यांना देताच, तेदेखील तातडीने जिल्हा स्त्री रूग्णालयात हजर झाले व नवजात बालकाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या डॉक्टर आणि नर्सवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
बाळाला श्वास घ्यायला त्रास होत असून, ते झटके मारत आहे, असे बाळाच्या वडिलांनी कर्तव्यावर हजर असलेल्या नर्सना पोटतिडकीने सांगितले, परंतु या नर्सनी तातडीने हालचाल करून संबंधित बालरोगतज्ज्ञाला बोलावले नाही. परिणामी, या नवजात बालकाचा तडफडून दुर्देवी मृत्यू झाला. या दोन नर्स कार्यमुक्त केल्या असल्या तरी त्यांनी केलेली हयगय दुर्लक्ष करता येणारी नाही. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचेच गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. जिल्हा स्त्री रूग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलांचे अतोनात हाल होत असून, याप्रश्नी लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे.
———