Breaking newsBuldanaBULDHANAChikhaliHead linesVidharbha

कोणतीही परवानगी न घेता एअरटेल कंपनी, ठेकेदाराने चिखली तालुक्यातील रस्ते खोदले!

– कारवाईसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने चिखली पोलिसांना दिले पत्र; अद्याप गुन्हे दाखल नाहीत!
– स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला ठेकेदार व कंपनीविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा

चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्त्यांवर ओएफसी केबल टाकण्यासाठी भारती एअरटेल कंपनीने ठेकेदारामार्फत अनधिकृत खोदकाम केले असून, रस्त्याच्या साईडपट्ट्या तसेच झाडेदेखील उखडून फेकली आहेत. विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम खात्याची कोणतीही परवानगी न घेता, हे खोदकाम करण्यात आले असून, हा ठेकेदार एका मोठ्या राजकीय नेत्याच्या जवळचा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कुणाच्या जोरावर नियम, कायदा अक्षरशः धाब्यावर बसविण्यात आला? असा संतप्त सवाल निर्माण होत आहे. याबाबत बांधकाम खात्याकडून चिखली पोलिसांना या कंपनीसह ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आले असून, पोलिसांनी मात्र अद्याप हे पत्र आपणास मिळाले नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एकूणच कंपनी व ठेकेदाराविरूद्धच्या कारवाईबाबत संशय निर्माण झालेला आहे.
कारवाईसाठी चिखली पोलिसांना देण्यात आलेले पत्र. तसेच, कंपनीला दिलेली नाेटीस व स्थळ पाहणी अहवाल.

सविस्तर असे, की भारती एअरटेल कंपनीने गेल्या महिनाभरापासून ओएफसी केबल टाकण्यासाठी चिखली तालुक्यातील रस्ते अनधिकृतपणे उखडणे सुरू केलेले आहे. हे काम एका राजकीय नेत्याच्या जवळच्या ठेकेदाराने घेतल्याची चर्चा असून, हा ठेकेदार कुणालाही जुमानत नाही, असे दिसते. वास्तविक पाहाता, असे काम अंडरग्राउंड मशीनद्वारे करणे आवश्यक असताना रस्ते व रस्त्याच्या साईडपट्ट्या जेसीबीच्या सहाय्याने उखडण्यात आल्या आहेत. डांबरी रस्त्याच्या कडेला मोठमोठे खड्डे खोदले गेले होते, त्यामुले एखाद्या भीषण अपघाताचीही शक्यता होती. चिखली – एकलारा ते एकलारा-अंबाशी फाटा या रस्त्यावर असे बेकायदेशीर खोदकाम करण्यात आले असून, मातीचे ढिगारे रस्त्यावर पडलेले असल्याने तसेच खड्डे खोदले गेल्याने किरकोळ अपघातांची मालिकाच या रस्त्यावर सुरू होती. नुकत्याच झालेल्या खंडाळा मकरध्वज रस्त्याच्या साईडपट्ट्यादेखील खोदण्यात आल्याने हा रस्तादेखील उखडत चालला असून, अपघातांची शक्यता वाढली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तक्रार व ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर थातूरमातूरपणे खड्डे भरले गेले आहेत. परंतु, रस्त्यांची मात्र वाट लागली आहे.

याबाबत चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी याबाबत अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्रच आपल्याला मिळाले नाही, असे सांगितले. तसेच, असे पत्र मिळाल्यानंतर नियमाप्रमाणे जी काही असेल ती कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन.

विशेष म्हणजे, ठेकेदार व कंपनीने कुठेही खोदकामाची परवानगी घेतली नाही. निव्वळ बेकायदेशीरपणे रस्तेच खोदले नाही तर रस्त्यावरील झाडेही या ठेकेदार व कंपनीने बेकायदेशीरपणे तोडली आहेत. या ठेकेदार व कंपनीवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस नितीन राजपूत यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिखलीचे उपअभियंता यांना लेखी निवेदनाद्वारे दिलेला आहे. तसेच, खोदलेल्या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण व मजबुतीकरण करण्याची मागणीही करण्यात आली असून, कंपनीवर दंड आकारणी करण्याचीही मागणी केली आहे.


बांधकाम विभागाच्या नोटिसीलाही ठेकेदार व कंपनीने लावल्या वाटाण्याच्या अक्षता?

चिखली, खंडाळा मकरध्वज, शेलगाव जहागीर, एकलारा रस्त्यावर भारती एअरटेल लिमिटेड, पुणे यांनी ओएफसी केबल टाकण्यासाठी सदर रस्त्यालगत नियमबाह्य खोदकाम केले असल्याचे आढळून आल्याने, तसेच रस्त्याच्या बाजूपट्ट्यांचे नुकसान झालेले आढळून आल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चिखलीचे कनिष्ठ अभियंता एम. एल. केंधळे यांनी उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिखली यांना कार्यवाही करणेबाबत १ जानेवारी २०२४ रोजीच पत्र दिले होते. त्यानुसार, उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिखली यांनी भारती एअरटेल कंपनीला ४ मार्च २०२४ रोजी नोटीस बजावून तातडीने खोदकाम थांबविण्याचे आदेश दिले होते. तसेच, काही अपघात झाल्यास सर्वस्वी जबाबदारी कंपनीची राहील, असेही ठणकावले होते. तसेच, खोदलेला भाग पूर्ववत करून देण्याचेही आदेश दिले होते. परंतु, संबंधित ठेकेदार व एअरटेल कंपनीने या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे दिसते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिखलीचे उपविभागीय अधिकारी यांनी ३० एप्रिल २०२४ रोजी चिखली पोलिस ठाण्यास पत्र देऊन भारती एअरटेल कंपनीवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली होती. या कंपनीने नियमबाह्य खोदकाम करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला, तसेच रस्त्याचे नुकसान केले, त्यामुळे पोलिसांनी नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी बांधकाम विभागाने केली होती. परंतु, चिखली पोलिसांनी अद्यापही हे पत्र आपणाला मिळाले नाही, असे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणात कारवाईबाबतचे गौडबंगाल काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.


केबल कामामुळे रस्त्याचे काम रखडले; विद्यार्थी-विद्यार्थिनींचीही झाली हेळसांड!

सदर रस्त्याचे रुंदीकरण काम सुरु आहे. परंतु ठेकेदाराने ओएफसी केबलच्या कामासाठी रस्ता उकरून टाकलेला असल्याने आणि काही ठिकाणी केबल वर-खाली असल्याने रस्ता खोदकाम करणे अडथळ्याचे ठरले आहे. एवढेच नाही तर कामात काम म्हणून रस्त्याच्या कामातच आपलं काम करून घेऊ, हा उद्देश ठेवल्याने ऐन बारावीच्या परीक्षा असतांना आणि रस्ता काम सुरु असल्याने बससेवा बंद असल्याने शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना मोठा अडचणीचा सामना करावा लागला होता. असे असतांना वारंवार बांधकाम विभागाला सदर बाब निदर्शनास आणून दिली. परंतु पंचनामा होऊन सर्व प्रकार समोर आल्यानंतरही कारवाई करण्यात आली नसल्याने आता या प्रकरणी दंड आकारणी होऊन मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन बांधकाम विभागात छेडणार आहोत.

– नितीन राजपूत, जिल्हा सरचिटणीस स्वाभिमानी शेतकरी संघटना, बुलढाणा
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!