चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील वाघापूर येथे नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी संबंधित SRL कंन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीने टँकरने पाणी आणणे गरजेचे असताना, हा ठेकेदार चक्क ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यावर डल्ला मारत आहे. आधीच गावात पाणीसमस्या असताना हा ठेकेदार खुलेआम गावातील पिण्याच्या पाण्याच्या बोअरचे पाणी वापरत असल्याने ग्रामस्थांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
वाघापूर गावात ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी गावात एक बोअरवेल आहे. या बोअरवेलचे पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरतात. पाण्यासाठी हा एक महत्वपूर्ण स्त्रोत गावात असल्याने गावाची भिस्त याच बोअरवेलवर आहे. अशातच येथील नदीवर पुलाचे बांधकाम चालू असून, या बांधकामासाठी संबंधित ठेकेदाराने टँकरने पाणी आणणे गरजेचे आहे. परंतु, हा ठेकेदार चक्क याच बोअरवेलचे पाणी खुलेआम वापरत असून, गावात पाणीसमस्या निर्माण करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
सद्या कडक उन्हाळा जाणवत असून, मे हीट निर्माण झाली असल्याने अनेक गावांत पाणीटंचाई आहे. परंतु, वाघापूर ग्रामस्थांना बोअरवेलच्या पाण्याचा मोठा आधार आहे. याच पाण्यावर ठेकेदार हा अनधिकृतपणे डल्ला मारत असल्याने ठेकेदाराचा पाणीउपसा तातडीने थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. गावाच्या पाण्याचा ठेकेदाराने वापर थांबवला नाही तर मात्र ग्रामस्थ हे पाणी स्वतः बंद करणार असून, तीव्र आंदोलनही छेडतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे.
———-