CrimeHead linesSINDKHEDRAJA

आईने मोलमजुरी करून वाढविले; मोठा भाऊ लहान भावांच्या जीवावर उठला; हाणामारीत एकजण ठार!

– साखरखेर्डातील भावांच्या तुंबळ हाणामारीतील लहान भावाचा आज अखेर दुर्देवी मृत्यू
– दोन भाऊ अद्यापही कोमात; पोलिसांनी खुनाचे कलम लावले; हल्लेखोर भावासह पुतणे पोलिसांच्या अटकेत

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथील मेहकर रोडवरील महालक्ष्मी तलावाजवळील ई – क्लास जमिनीवरून चौघा भावंडात १९ एप्रिलरोजी लाठ्याकाठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली होती. यात तिघे गंभीर जखमी झाले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव एकनाथ सीताराम टाले वय ३० वर्ष असे आहे. वडिलांच्या निधनानंतर आईने मोलमजुरी करून या भावंडांना लहानचे मोठे केले. परंतु, मोठा भाऊ लहान तीन भावांच्या जीवावर उठला, त्यातील एकाचा त्याने मारहाणीत जीव घेतला असून, उर्वरित दोघेजण अद्यापही कोमात आहे. हल्लेखोर भावासह त्याचे मुले सद्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.
एकनाथ सीताराम टाले आणि भावाचा याच धाब्याच्या जागेवरून वाद झालेला आहे.

सविस्तर असे, की साखरखेर्डा येथील सीताराम टाले यांना सात मुले आहेत. ३५ वर्षांपूर्वी पित्याचे छत्र हरपले. आईने रामदास, भानुदास, देविदास, हरिभाऊ, पांडुरंग, अंबादास, एकनाथ यांचा मोलमजुरी करून संभाळ केला. रामदास, भानुदास, अंबादास, देविदास हे मोलमजुरी करून शेती व्यवसायाकडे वळले. तर लहान भावंडांनी महालक्ष्मी तलावाच्या काठावर ई- क्लास जमिनीवर टुमदार धाबा सुरु केला. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून लहान वयात अल्पावधीतच त्यांनी व्यवसायात जम बसवला होता. तिघांचेही विवाह झाले. मालक कोण आणि नोकर कोण, यातील फरक कळत नव्हता. २५ वर्षांपासून सुरु असलेल्या व्यवसायावर देविदास यांची नजर लागली. ही जागा मलाच हवी अशी मागणी करुन तिघाही लहान भावंडांना जिवे मारण्याची धमकी देऊ लागला. तिघांनी बाजूची जागा तुला देतो. तुम्ही भांडण करु नका म्हणून गयावया तिघांनी मिळून केली. परंतु, मला हीच जागा पाहिजे असा हट्ट धरून देविदास यांच्या अंगात राक्षस संचारला. दोन मुलांना सोबत घेऊन तिघाभावंडांचा काटा काढण्यासाठी हातात लाठ्याकाठ्या लोखंडी रॉड घेऊन १९ एप्रिलरोजी सकाळी अचानक हल्ला केला. बेसावध असलेल्या तिघेही हरिभाऊ, पांडुरंग, एकनाथ यांच्या डोक्यात जबर मारहाण झाल्याने तिघेही लहान भाऊ गंभीर जखमी झाले. बेशुद्ध अवस्थेत तिघांना चिखली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघेही कोमात असल्याने त्यातील एकनाथ यांचा आज, ८ मेरोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोघांवर अद्याप उपचार सुरू आहेत.
फिर्यादी पांडुरंग सीताराम टाले यांनी ३० एप्रिलरोजी या प्रकरणी साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये तंक्रार दाखल केली असता, साखरखेर्डा पोलिसांनी आरोपी देविदास सीताराम टाले, पवन देविदास टाले, श्रीकृष्ण देविदास टाले यांच्याविरोधात कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. काल रात्री ३०७ कलम लावण्यात आले होते, तर आज खुनाचा कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ठाणेदार स्वप्निल नाईक यांनी सांगितले. यातील मुख्य आरोपी देविदास सीताराम टाले, पवन देविदास टाले, श्रीकृष्ण देविदास टाले यांना साखरखेर्डा पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!