Breaking newsBULDHANAChikhaliHead linesMaharashtraVidharbha

खत कंपन्यांवर ‘महाशक्ती’चा दबाव!; खत दरवाढ तात्पुरती गुंडाळली??

– आता ‘इलेक्शन’नंतर खत दरवाढीचा झटका बसण्याची दाट शक्यता?
– खतांच्या किमती निश्चित करून शेतकर्‍यांचा संभ्रम दूर करा – विनायक सरनाईक

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – खरिप हंगामाच्या तोंडावर खतांचे दर वाढवले गेले होते. परंतु, ऐन लोकसभा निवडणुकीत या दरवाढीचा मोठा फटका बसत असल्याचे लक्षात येताच, व शेतकर्‍यांचा उसळलेला जनक्षोभ पाहाता, ‘महाशक्ती’ने रातोरात चक्रे फिरवून खत दरवाढ तात्पुरती गुंडाळली असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता उलट खत दरवाढ झालीच नाही, असे कंपन्यांना सांगण्याचे सांगण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तथापि, लोकसभा निवडणुकीनंतर ही दरवाढ होऊ शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, काही ठिकाणी वाढीव दराने खते विकल्या जात असून, कंपन्या व कृषी अधिकारी मात्र खत दरवाढ झाली नाही, असे सांगत असल्याने शेतकर्‍यांचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी केली आहे. कृषीनिविष्ठा केंद्रांकडून शेतकर्‍यांची फसवणूक होऊ शकते, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
खत दरवाढीवरून शेतकरी संभ्रमात.

राज्यात खरीप हंगाम सुरु होण्याला आता बोटावर मोजण्याइतक्या दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. सद्या शेतीपिकांना अजिबात भाव नाही. रब्बी हंगामही वाया गेलेला आहे. सोयाबीन साडेचार हजाराच्या पुढे जात नाही. सोयाबीनला बाजारात हमी भावापेक्षाही कमी भाव आहे. कापूस ७ हजाराच्याच्या आत आहे. फरतडीच्या कापसाचे भाव चार हजारपेक्षा कमी आहेत. इतर शेतीपिकांची अवस्था अशीच असून, या भावात माल विकायचा तर उत्पादन खर्चही निघत नसताना रसायनिक खतांच्या किमतीत मात्र वारेमाप वाढ झाली होती. याबाबतचे वृत्त शेतकर्‍यांच्या हवाल्याने बहुतांश मीडियाने दिले होते. त्यामुळे आधीच मोदी सरकारविरोधात असलेल्या संतापात यानिमित्ताने आणखी भर पडली होती. त्याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपला बसणार होता. त्यामुळे ‘महाशक्ती’ कामाला लागली अन रातोरात हा दरवाढीचा निर्णय गुंडाळला गेला, असे आता खात्रीशीर सूत्राने सांगितले. तथापि, लोकसभा निवडणुकीनंतर ही दरवाढ होऊ शकते, असेही सूत्राचे म्हणणे आहे.
दरम्यान, याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले, की गेल्या दोन ते चार दिवसांपासून खत दरवाढीसंदर्भात खतांच्या किमतीत २०० ते ४०० रुपयांची दरवाढ झाल्याच्या बातम्या न्यूज चॅनलवर व प्रसार माध्यमातून प्रकाशित झाल्या आहेत. परंतु खत दरवाढ झाली नसल्याचा निर्वाळा कृषी विभाग व कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण यांच्या माध्यमातून दिला जात आहे. परंतु खरं काय, खोटं काय, हे सर्वसामान्य शेतकरी यांना माहिती नाही. परंतु या दरवाढीच्या भानगडीत शेतकर्‍यांची लूट होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या खत दरवाढीप्रकरणी जिल्ह्यात कृषी विभागाने जनजागृती करावी व नेमके दर कुठले ते शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवावे, आणि त्याबाबतचे दर फलक हे कृषी केंद्रामधे लावण्यात यावे, अशी मागणी विनायक सरनाईक यांनी कृषी विभागाकडे केली आहे. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे मागणीसुद्धा करण्यात आली आहे.


शेतकरी नेतेे विनायक सरनाईक.

शेतकरी संकटात असतांना सोयाबीन, कापसाचे भाव पडलेले असतांना आणि त्यातच हरभरा पिकाचे नुकतेच नुकसान झालेले असताना, शासन शेतकरीहिताचे निर्णय घेण्याचे सोडून शेतकरीविरोधी निर्णय घेत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. आणि, त्यातच ऐन खरिपाच्या तोंडावर खताच्या किमतीत वाढ झाल्याच्या बातम्या आल्याने आणि सद्यस्थितीत निवडणुका असल्याने सत्तेत असणारे म्हणतात भाव वाढले नाही आणि विरोधक मात्र म्हणतात भाव वाढले. राजकारणात जे व्हायचं ते होईल, परंतु या दरवाढीच्या भानगडीत मात्र शेतकर्‍यांची आर्थिक लूट होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने याबाबत शेतकर्‍यांमधील संभ्रम दूर करायचा असेल तर कृषी केंद्रातील दरफलकांवर खतांच्या किमती निश्चित करण्यात याव्यात, शेतकर्‍यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे शेतकर्‍यांची लूट झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात यावी.
– विनायक सरनाईक, शेतकरी नेते
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!