अखेर निमगाव वायाळ येथील रेतीघाटाचे तांत्रिक मोजमाप करण्याचे तहसीलदारांचे आदेश!
– वाळूतस्करांचे आता पितळ उघडे पडणार; रेतीतस्करांना साथ देणार्या शेतकर्यांनाही बसणार कारवाईचा दणका!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – निमगाव वायाळसह परिसरातील गावांतून खुलेआम रेतीतस्करी सुरू असल्याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सडेतोड वृत्त प्रकाशित केल्यानंतर महसूल विभाग ‘अॅक्शन मोड’वर आला असून, ज्या निमगाव वायाळ येथी रेतीघाटाचे तांत्रिक मोजमाप करण्याचे आदेश सिंदखेडराजा तहसीलदारांनी उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग देऊळगावराजा व उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, सिंदखेडराजा यांना दिले आहे. त्यामुळे लवकरच रेतीतस्करांचे पितळ उघडे पडणार असून, गौणखनिज चोरीपोटी त्यांच्याकडून कोट्यवधी रूपये वसूल होणार आहेत. रेतीतस्करांना ५०० रूपये प्रति डंपर रूपये घेऊन साथ देणार्या शेतकर्यांच्याही सातबारावर बोझा चढविला जाणार असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे रेतीतस्करांसह संबंधित शेतकर्यांचेही चांगले धाबे दणाणले आहेत. या भागांतील ताडशिवणी, राहेरी बुद्रूक, दुसरबीड, निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा या गावांतील रेतीतस्करीसंदर्भात सिंदखेडराजा-देऊळगावराजा तालुका विकास संघर्ष समितीच्यावतीने कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी कठोर भूमिका घेऊन महसूल प्रशासनाला रेतीतस्करांविरोधात कठोर कारवाईसाठी कामाला लावले आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील ताडशिवणी, राहेरी बुद्रूक, दुसरबीड, निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा या गावांमधून रात्रंदिवस अवैध रेतीउपसा जोरात सुरू असून, महसूल विभागाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सडेतोड वृत्त व सिंदखेडराजा-देऊळगावराजा तालुका विकास संघर्ष समितीने उपविभागीय अधिकारी प्रा.खडसे यांची भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर महसूल प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. त्यानुसार, काल निमगाव वायाळ येथून रेतीवाहतूक करणारे वाळूतस्करांचे रस्ते जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकल्यानंतर, आज सिंदखेडराजा तहसीलदारांनी उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग देऊळगावराजा व उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, सिंदखेडराजा यांना निमगाव वायाळ येथील रेतीघाटाच्या तांत्रिक मोजमापाचे आदेश दिले आहेत. या आदेशात नमूद आहे, की सन २०२२-२०२३ वाळू ई-निविदामध्ये या तालुक्यातील निमगाव वायाळ येथील वाळूडेपोची निविदा मंजूर झालेली आहे. त्यानुसार, संबंधित निविदाधारकांनी निमगाव वायाळ येथील रेतीघाटातून रेती उत्खनन केलेले आहे. तरी निमगाव वायाळ येथील रेती घाटातून किती ब्रास रेती उत्खनन झाले आहे, याबाबत तांत्रिक मोजणी करून आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल या कार्यालयास तत्काळ सादर करावा, असे आदेश तहसीलदारांनी दिलेले आहेत. सिंदखेडराजाचे तहसीलदार धानोरकर यांनी हे आदेश काढले असून, मंजूर ब्रासपेक्षा जास्त रेती उपसा करून वाळूतस्करी करणार्यांना तसेच, वाळूतस्करांना आता जोरदार दणका बसणार आहे. तहसीलदारांच्या या कारवाईने वाळूतस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे ‘अॅक्शन मोड’वर; वाळूतस्कर टरकले!
सिंदखेडराजा तालुक्यातून चालणारी वाळूचोरी ही गंभीर बाब असल्याचे सांगत, वाळूतस्करांना रोखण्यासाठी यापुढे कठोर पाऊले उचलली जातील, असे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. प्रा. खडसे हे अतिशय प्रामाणिक अधिकारी असून, एकीकडे महसूल विभागातील काही अधिकारी-कर्मचारी यांची हप्तेखोरी व दुसरीकडे फोफावलेले वाळूतस्कर या दोघांनाही वठणीवर आणण्याचे शिवधनुष्य त्यांना उचलावे लागत आहे. तरीही अनोखी शक्कल लढवून या समस्येवर मात करू, व शासनाचे गौणखनिज रक्षण करू, असे ते म्हणाले. रेतीमाफियांची अजिबात गय केली जाणार नाही. जे शेतकरी रेतीमाफियांना रस्ता उपलब्ध करून देतात, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. याबाबत मंडल अधिकारी व तलाठी यांनी सूचना केली जाईल. तसेच, जो कुणी मंडल अधिकारी व तलाठी कामचुकारपणा करेल, त्याच्यावर यापुढे कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रा. खडसे यांनी दिला आहे. प्रा. खडसे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकार्यामुळे वाळूमाफियांसह हप्तेखोर अधिकार्यांच्या पायाखालची चांगलीच वाळू सरकली आहे.
———–