Breaking newsBuldanaBULDHANADEULGAONRAJAHead linesSINDKHEDRAJAVidharbha

ताडशिवणी, राहेरी बुद्रूक, दुसरबीड, निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा गावांतून रात्रंदिवस वाळूची तस्करी सुरू!

– महसूल विभागाच्या रेतीतस्करांविरूद्धच्या कारवाईला सिंदखेडराजात अचानक ब्रेक; गौडबंगाल काय?

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – वाळूतस्करांविरोधात मध्यंतरी सिंदखेडराजा महसूल विभागाने सुरू केलेली धडक कारवाई आता अचानक व आश्चर्यकारकरित्या थांबली गेली असल्याचे दिसून येत आहे. तर वाळूतस्करांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडला असून, जोरात वाळूतस्करी सुरू आहे. खास करून ताडशिवणी, राहेरी बुद्रूक व दुसरबीड, निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा या गावांतून खुलेआम व रात्रंदिवस वाळूचे डंपर वाळूचोरी करताना दिसून येत आहेत. विशेष बाब म्हणजे, राहेरी बुद्रूक या गावातून पाताळगंगा व नागपूर डाकलाईन, भगवती मंदीर वरती असलेल्या शेतांमधून वाळूचे डंपर सोडण्यासाठी काही शेतकरी वाळूचोराकडून प्रतिडंपर ५०० रूपये घेत असल्याने काही शेतकर्‍यांचाही वाळूचोरांना पाठिंबा असल्याचा धक्कादायक प्रकार ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या पाहणीतून आढळून आला आहे. याबाबत सिंदखेडराजा-देऊळगावराजा तालुका विकास संघर्ष समितीच्यावतीने लवकरच महसूल मंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली जाणार असल्याचे या समितीचे अध्यक्ष अनिल दराडे यांनी दिली आहे.

सविस्तर असे, की ताडशिवणी, राहेरी बुद्रूक, दुसरबीड या गावांमधून रात्रंदिवस अवैध रेती उपसा जोरात सुरू असल्याने महसूल विभागाचा खूप मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. राहेरी बुद्रूक या गावामधून पातळगंगा व नागपूर डाक लाईन व भगवती मंदिर वरती असलेल्या शेतामधून शेतकरी आपल्या शेतामधून वाळूतस्करांची वाहने सोडण्याकरिता प्रतिवाहन पाचशे रुपये उकळत आहेत. ताडशिवनी या गावातून टिप्परवाले राजेरोषपणे रेती उपसा करत असून, ही माहिती स्थानिक तलाठी टेकाळे व दुसरबीड येथील मंडळ अधिकारी पदाचा कारभार असलेले राहुल देशमुख व सिंदखेडराजा येथील महसूल विभागातील अधिकारी यांना फोन व व्हाटसअपद्वारे दिली असता, ते काहीही कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे या अधिकार्‍यांच्या संगनमताने वाळूतस्करी सुरू आहे का, असा सवाल संतप्त ग्रामस्थ व शेतकरी करत आहेत. या वाळूतस्करीपोटी महिनाकाठी कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत असून, यापैकी किती या अधिकार्‍यांच्या खिशात जात आहे, याबाबत संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटताना दिसत आहेत.
या भागातील नदीपात्रांचा पंचनामा करण्यात येऊन, तसेच शेतरस्त्यांची पाहणी केल्यास मोठ्या प्रमाणात वाळूचोरीचा प्रकार उघडकीस येईल. त्यामुळे अवैध रेतीउपसा झालेल्या नदीपात्रांचे मोजमाप व पंचनामे करण्यात यावे, या मागणीसाठी लवकरच सिंदखेडराजा-देऊळगावराजा तालुका विकास संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी व महसूलमंत्री यांच्याकडे निवेदन दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राहेरी बुद्रूक येथील ट्रॅक्टरवाले आणि ताडशिवणी, लिगा, पिंपळगाव, कुडा, दुसरबीड, जळका येथील वाळूचोरी करणारे काही टिप्पर, जेसीबीवाले या वाळूतस्करीतून मालामाल होत असून, त्यांना या भागातील मंडल अधिकारी, तलाठी, सिंदखेडराजाचे तहसीलदार यांचा आशीर्वाद असल्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!