शहरटाकळीतील देवीच्या छबिना मिरवणुकीला गालबोट; युवकाचा निर्घृण खून
नगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या वादातून युवकास सात ते आठ जणांच्या सशस्त्र टोळक्याने जबर मारहाण करण्यात आली. जखमी झालेल्या युवकास शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने तालुका हादरला गेला आहे. गावातील लक्ष्मीदेवीच्या यात्रेला यानिमित्ताने पहिल्यांदाच गालबोट लागले आहे.
सविस्तर असे , की शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे गुरुवारी रात्री साडेदहा वाजता गावातील लक्ष्मीदेवी आईच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीमध्ये जुन्या किरकोळ वादावरून सात ते आठ जणांनी सशस्त्र हल्ला करून अक्षय आपशेटे रा. शहरटाकळी यास गंभीर जखमी केले. रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान संबंधित प्रकार घडला असून, जखमी युवकास उपचारासाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता, रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला.
शेवगाव पोलीस स्टेशन येथे त्याचे बंधू संकेत संजय आपशेटे वय २८ यांनी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीनुसार भा.द.वि.च्या कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३ प्रमाणे आरोपी अजय दावीत कोल्हे, किरण उत्तम चव्हाण, पंकज लक्ष्मण कोल्हे, अविनाश साईनाथ पवार, ल विकास संजय कोल्हे व यांच्याबरोबर गावातील इतर तीन ते चार इसम होते, असा गुन्हा दाखल केला गेला आहे. सदरची घटना पाहणार्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, की गुरूवारी, २ तारखेला रात्री साडेदहा वाजता लक्ष्मीदेवी मंदिराजवळ स्ट्रीट लाईटमध्ये सात ते आठ इसम घातक शास्त्रांनी अक्षय संजय आपशेटे वय २४ यास लाथा बुक्क्यांनी आणि घातक शास्त्राने जबर मारहाण करताना पहिले. संबंधित गुन्ह्यांमध्ये एक आरोपीस अटक करण्यात आली असून, इतर आरोपी फरार झालेले आहेत. गुन्ह्याचा तपास शेवगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. लवकरच फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, असे पोलिसांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार!
जोपर्यंत संबंधित आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. परंतु पोलीस प्रशासनाने चार दिवसांमध्ये त्वरित आरोपींना पकडण्याची हमी दिल्याने व गावातील इतर जेष्ठ मंडळींनी मध्यस्थी केल्याने अंत्यविधी करण्यास नातेवाईकांनी तयारी दर्शवली होती, व शेवटी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.
———