Head linesSINDKHEDRAJA

रात्रभर वीजपुरवठा खंडित; सकाळी ट्रान्सफॉर्मरने घेतला पेट!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथील शिक्षक कॉलनीतील नागरिकांना वीजपुरवठा करणार्‍या ट्रान्सफॉर्मरने आज, दि.३ मेरोजी सकाळी अचानक पेट घेतल्याने वीजपुरवठा तर खंडीत झालाच पण वज्ीा कर्मचार्‍यांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याने मोठी दुर्घटना टळली. विशेष म्हणजे, रात्रभर वीज पुरवठा खंडित असताना, सकाळी ट्रान्सफॉर्मर पेटल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल झालेत.
शिक्षक कॉलनीत ट्रान्सफॉर्मरने घेतलेला पेट.

साखरखेर्डाच्या दक्षिण भागातील शिक्षक कॉलनीतील नागरिकांना वीजपुरवठा करणार्‍यासाठी शेंदूर्जन रोडवर १०० एच् पी.क्षमतेचे विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविलेला आहे. या वीज रोहित्राची क्षमता कमी आणि वीज जोडण्यांची संख्या अधिक असल्याने हे रोहित्र पूर्ण क्षमतेने ग्राहकांना सुरळीतपणे वीजपुरवठा करू शकत नाही. असे नेहमीचे चित्र आहे. याबाबत येथील कनिष्ठ अभियंता तथा वीज कर्मचार्‍यांना वेळोवेळी सांगितले असता, किमान २०० एच् .पी. क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्याची गरज आहे. शिक्षक कॉलनीतील नागरिकांना सातत्याने खंडित विजपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. वारंवार खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे तप्त उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असून, पाणी पुरवठा प्रभावित होऊन पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहेत. लहान मुले गरमीने अस्वस्थ होत आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात महत्त्वापूर्ण गरज असलेल्या मोबाईलची चार्जिंग संपुष्टात आल्याने अनेक नागरिकांचा एकमेकांशी संपर्क तुटत आहे. याबाबत शिक्षक कॉलनीतील नागरिकांनी येथील कार्यालयाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणताही बदल झाला नाही.
काल २ मे रोजी या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला असता रात्रभर वीजपुरवठा खंडीत झाला होता. येथील वीज वितरण कंपनीचे कर्मचारी चेतन राजपूत व दत्ता मुदमाळी यांनी आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास वीज बिघाड दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी या जनित्राजवळ आले असता जनित्राचे झाकण उघडताच पेट घेतला. जनित्र विझविण्यासाठी या कर्मचार्‍यांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तोपर्यंत अरूण जैवळसह आणखी कर्मचारी आपापल्या परीने प्रयत्न करीत लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करून कशीबशी आग आटोक्यात आणली. घटनेबाबत येथील नागरिकांनी कनिष्ठ अभियंता पाटील यांना माहिती दिली व लवकरात लवकर जळालेले जनित्र बदलून जास्त क्षमतेच्या जनित्राची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. वीज वितरण कंपनीच्या विभागीय तथा जिल्हा स्तरावरील महावितरण अधिकारी यांनी येथील शिक्षक कॉलनीतील नागरिकांना होणार्‍या त्रासाची दखल घेऊन युध्दस्तरावर जास्त क्षमतेच्या जनित्राची स्थापना करावी जेणेकरून नागरिकांना वीजपुरवठा सुरळीत मिळेल, अशी मागणी केली आहे.तसेच केबलव्दारे वीज पुरवठा वितरित करण्याची सोय करण्यात यावी, अशीही मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!