ई-केवायसीच्या नावाखाली साखरखेर्डातील व्यापार्याला साडेसहा लाखाला गंडविले!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथील हार्डवेअर व्यापार्याला ऑनलाईन केवायसी अपडेट करण्याचे सांगून, सायबर भामट्यांनी तब्बल ६ लाख ५६ हजार ११ रुपयाने गंडविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सायबर क्राईम पोलीस स्टेशन बुलढाणा येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मेहकर येथील व्यापारी हेमंत सखाराम लाहोटी यांचे साखरखेर्डा येथे हार्डवेअर दुकान असून, साखरखेर्डा येथील भारतीय स्टेट बँकेत त्यांचे करंट अकाऊंट आहे. या बँकेच्या खात्यावरुन ई-केवायसी अपडेट करण्यासाठी अर्ज मागविण्यात आला. त्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली असता, सहावेळा ओटीपी नंबर मागविण्यात आला. हेमंत लाहोटी यांनी ओटीपी नंबर देताच त्यांच्या भारतीय स्टेट बँकेच्या खात्यातून वेगवेगळ्या स्वरुपात रक्कम वळती करण्यात आली. त्यांना आपल्या खात्यातून ६ लाख ५६ हजार ११ रुपये काढल्याचे लक्षात येताच त्यांनी मेहकर येथील मामेभाऊ यास माहिती दिली. ते मेहकर पोलीस स्टेशनमध्ये तंक्रार दाखल करण्यासाठी गेले असता, त्यांना बुलढाणा येथील सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये तंक्रार दाखल करण्यासाठी पाठविले. बुलढाणा येथे कलम ४१९ , ४२० , ६६( सी ) , ६६(डी ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत. कुणालाही आपला ओटीपी देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केलेले आहे.
————