पवारांनी डाव टाकला; सिंदखेडराजा मतदारसंघात ‘काकाविरूद्ध पुतणी’!
– हभप. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन; आणि राजकीय जीवनाचा श्रीगणेशा!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – राजकारण आणि समाजकारण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू जरी असल्या तरी समाजकारण केल्याशिवाय राजकारणाचा दरवाजा उघडला जात नाही. याची काहीशी कल्पना जाणून स्व. मुन्ना उर्फ गणेश शिंगणे यांच्या कन्येने हाती तुतारी घेऊन आपल्या राजकीय कारकिर्दीतील श्रीगणेशा आपले मूळगाव शेंदुर्जन येथून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हभप. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तन आयोजनाच्या माध्यमातून करण्याचे निश्चित केल्याचे दिसून येत आहे. एकीकडे राज्यात काकाविरूद्ध पुतण्या असा राजकीय संघर्ष झडत असताना, सिंदखेडराजा मतदारसंघात मात्र काकाविरूद्ध पुतणी असा राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. त्यासाठीच वस्तादाने (शरद पवार) डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याविरोधात निर्णायक डाव टाकण्यास सुरूवात केल्याचीही राजकीय चर्चा सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघात आहे.
सहकार महर्षी कै.भास्करराव शिंगणे यांचा सहकार क्षेत्रातील जीवनपट उलगडला तर बुलढाणा जिल्ह्यातील कानाकोपर्यात सहकाराचे जाळे निर्माण करुन शेतकर्यांच्या मुलांना रोजगार मिळवून देणारे एक महान लोकनेता अशी त्यांची कारकीर्द राहिलेली आहे. ‘साहेब’ ही एकच पदवी, ‘साहेब’ बुलढाणा येथून निघाले तर ते कोणत्या मार्गाने सिंदखेडराजा मतदारसंघात येणार याची कुणकुण काही कार्यकर्त्यांना लागायची. शेकडो कार्यकर्ते प्रत्येक फाट्यावर, बसस्थानकावर आपली समस्या घेऊन उभे असायचे. प्रत्येकाची समस्या ऐकत, निवारणही ते करीत. याही पलीकडे जाऊन त्यांनी सहकार चळवळ उभी केली. सहकारी संस्था, सुतगिरणी, खत कारखाना, दूध उत्पादक सहकारी संस्था, जिल्हा सहकारी बँक, ग्रामसेवा सहकारी सोसायटी, मार्वेâटिंग फेडरेशनचे जिल्हाभर जाळे तयार करत राहिले. त्यांच्या हयातीत एकही संस्था, सुतगिरणी तोट्यात नव्हती. कारण कल्पक बुद्धिमत्ता त्यांच्या अंगी होती. हिमालयासारखा ताठ मानेने ते जगले, व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत ते राजकारणात एकनिष्ठही राहिले. म्हणून आजही त्यांच्या कार्याची बरोबरी तीनवेळा खासदार करा, दहावेळा आमदार करा, की शेवटपर्यंत मंत्री करा, यांच्यापैकी कुणाकडूनही झालेली नाही, आणि होणारही नाही. राजकारण हे फिरत्या संगीतखुर्ची सारखे असते. सहकार महर्षी कै. भास्करराव शिंगणे यांचे चिंरजीव गणेश उर्फ मुन्ना शिंगणे हे एक लढवय्या युवानेते म्हणून १९९० पासून उदयास आले होते. परंतु, राजकारण आणि सहकार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे आल्याने मुन्ना शिंगणे यांना थांबावे लागले. आमदार तथा माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असताना त्यांनी सिंदखेडराजा मतदारसंघातच नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यात आगळीवेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांना मानणारा युवकवर्ग मोठा होता. हे वादळरुपी व्यक्तिमत्व राजकारणात सक्रिय जरी असले तरी त्यांच्याकडे जबाबदारी कोणतीही नव्हती. सहकार क्षेत्रातील पदही त्यांना मिळाले नाही. अशातच त्यांचा अकाली मृत्यू त्यांच्या वाढदिवसाच्याच दिवशी ४ सप्टेंबर २००६ साली झाला. युवकांचा आधारवड कोसळला आणि शिंगणे साहेबांना एकाएकी सोडून ते निघून गेले.
आज त्यांना जाऊन १८ वर्ष झाली. नवीन पिढी राजकारणात आली. मुन्नासेठ शिंगणे म्हणजे काय यांना माहिती नाही. कदाचित सहकार महर्षी कै . भास्करराव शिंगणे आणि कै. गणेश उर्फ मुन्नासेठ शिंगणे यांचा कणखर वारसा घेऊनच त्यांच्या कन्या गायत्री शिंगणे व चिरंजीव गौरव शिंगणे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आजोबाच्या काळापासूनची साथ कायम ठेवली व वैचारिक, राजकीय वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार याच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी घेऊन गायत्री गणेश शिंगणे आणि गौरव गणेश शिंगणे यांनी शरद पवार यांच्या विचारांचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. एकीकडे माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हे शरद पवारांची साथ सोडून बंडखोर नेते अजित पवार यांच्या गटात गेले असताना, त्यांच्या पुतणीने मात्र पवार साहेबांसोबत राहण्याचे निश्चित केल्याने जिल्ह्यात काकाविरूद्ध पुतणी असा नवा राजकीय संघर्ष उदयास आला असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. वास्तविक पाहाता, शरद पवार यांनी डॉ. शिंगणे यांना राजकीय कारकीर्दीत काहीच कमी पडू दिले नाही. आमदारकी, मंत्रीपद, खासदारकीसाठी संधी असं सर्वकाही दिले असताना डॉ. शिंगणे यांनी शरद पवारांची साथ सोडणे सिंदखेडराजा मतदारसंघासह जिल्ह्यात कुणाला आवडलेले नसताना, गायत्री शिंगणे यांचे पाऊल निश्चितच दिलासादायक मानले जात आहे.
आता गायत्री व गौरव शिंगणे या बहिणा-भावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करुन महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून १ मेरोजी शेंदुर्जन येथून तुतारी हातात घेऊन राजकारणाचा श्रीगणेशा करण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार हभप. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजितही करण्यात आलेला आहे. डॉ. राजेंद्र शिंगणेंना शह देण्यासाठी राजकारणातील वस्ताद अर्थात शरद पवार यांची राजकीय चाल असल्याची जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा आहे. महाविकास आघाडी सिंदखेडराजा मतदारसंघात हळूहळू पाय रोवत असताना, महाविकास आघाडीकडे एक नवा व आश्वासक चेहरा म्हणून गायत्री शिंगणे यांच्याकडे पाहिल्या जात आहे. सिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे डॉ.राजेंद्र शिंगणे अशी ओळख आहे, या पक्षाची सर्व सूत्रे त्यांच्याच हाती आहेत. त्यामुळे काकाविरोधात राजकारणात उभे राहून, राजकीय चक्रव्यूह भेदणे पाहिजे तेवढे सोपे नाही. तरीदेखील राजकारणातील चाणक्य पाठीशी असल्याने गायत्री शिंगणे हिला हजार हत्तीचे बळ प्राप्त झालेले दिसते आहे.
————