‘पाना’ फिरणार की, ‘मशाल’ धगधगणार?; उत्साह शिगेला!
– मोदी ‘लहरी’वर लागणार का ‘बाणा’वर ‘मोहर’?; नेत्यांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – लोकसभा निवडणुकीचे जिल्ह्यातील मतदान संपले असून, हा येणार, तो येणार, याबाबत दावे-प्रतिदावे केल्या जात आहेत. मतदारसंघाचा कानोसा घेतला असता पाना व मशाल जोरदार चालल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे नेमके कोण निवडून येणार, याची उत्सुकता शिगेला लागल्याचे दिसून येत आहे. तर ‘पाना’च्या गतीने ‘बाण’ घायाळ होण्याची शक्यता बळावली असून, रोडरोलरचा वेगही ‘बाणा’साठी ‘ताण’च असल्याचे सांगितले जात आहे. तर कॅमेर्याचा रोलही रिकामा राहिल्याची चर्चा आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास मोदी लाट नव्हे तर नुसत्या लहरा वर ‘बाणा’वर ‘मोहर’ लागेल का? याचीही चिंता आता नेत्यांसह कार्यकर्त्यांना सतावत असल्याचे बोलले जात आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी २६ जूनरोजी मतदान शांततेत पार पडले. यासाठी प्रशासनानेदेखील जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध तयारी केली होती. मतदारसंघात यावेळी ६२ टक्क्यांच्यावर मतदान झाले. या निवडणुकीत तब्बल २१ उमेदवार रिंगणात असले तरी महायुतीचे मावळते खासदार प्रतापराव जाधव महाविकास आघाडीचे प्रा. नरेंद्र खेडेकर व अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यातच सामना रंगल्याचे दिसले. विशेषतः यातील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांची निवडणूक तर जनतेनेच मनावर घेतली होती. जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, चिखली, जळगाव जामोदसह इतरही विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रविकांत तुपकर यांचा पाना चालल्याची चर्चा आहे. तर याच तालुक्यातील शहरी व ग्रामीणसह शेगाव, संग्रामपूर शहरी व ग्रामीण भागात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांची मशालदेखील मोठ्या प्रमाणात धगधगल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. खुद्द महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी दोन लाखाच्या फरकाने विजयी होवू, असा ठाम विश्वासदेखील व्यक्त केला आहे. तर शहरी भागात मात्र ‘पाना’ची गती धिमी झाल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. शहरी भागात काही ठिकाणी बाणदेखील चालल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतदारसंघात यावेळी रविकांत तुपकर यांचा पाना फिरणार, की महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांची मशाल धगधगणार याची उत्सुकता लागून आहे. आपला विजय निश्चित असून, मात्र निकाल काहीही लागो, यापेक्षाही जोमाने कामाला लागणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे. खा. प्रतापराव जाधव यावेळी चौकार मारण्यासाठी मैदानात उतरले असले तरी अँटीइन्कमबसी फॅक्टरचा जबर फटका बसण्याची शक्यता बळावली आहे. पंधरा वर्षाच्या भल्या मोठ्या काळात कामे झाली नाही, शिवाय भेटतही नाहीत, अशी उघड नाराजी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भरसभेत बोलून दाखवली होती. शिवाय ‘पाना’ने गती घेतल्यास त्याचा फटका खा.जाधव यांच्या बाणाला बसू शकतो. शिवाय, रोडरोलरचा वेगही प्रतापरावांसाठी धोक्याची घंटा असल्याचे सांगितले जाते. कारण गेल्यावेळी वंचित आघाडीचे बळीराम सिरस्कार यांनी तब्बल पावणे दोन लाख मते घेतली होती. यावेळी वंचित आघाडीचे वसंतराव मगर लाखाच्याआतच खेळतील अशी चर्चा आहे. तर अपक्ष संदीप शेळके यांनी मोठी प्रचार यंत्रणा राबवूनही ते अपेक्षित मते घेत नसल्याचा अंदाज राजकीय धुरीणांकडून व्यक्त केला जात आहे. कर्मचारी वर्गातही बहुतांश पाना व मशाल चालल्याचेच बोलले जात आहे.
तसे पाहिले तर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचेच आमदार आहेत. ही खा. जाधवांसाठी फार मोठी जमेची बाजू होती. पण प्रत्यक्ष मला मत देणे व माझ्या सांगण्यावरून मतदान करणे यात फार मोठे अंतर आहे. याबाबत काही कार्यकर्त्यांनी ‘तुमचे सांगा, आता आम्हाला मोकळे राहू द्या’ असे संबंधित आमदारांना बोलून दाखविल्याचेही ऐकायला मिळत आहे. तसेच उध्दव ठाकरेंना खा. जाधवांनी सोडून जाणं हे कडवट शिवसैनिकांच्या जिव्हारी लागले आहे. रविकांत तुपकर यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद, शिवाय खामगावातील उध्दव ठाकरेंची झालेली टोलेजंग सभा, यामुळे चिंतेत पडलेल्या खा.जाधवांनीदेखील जिल्ह्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा, नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांच्यासह दिग्गजांच्या सभा घेतल्या. एवढे कमी की काय म्हणून अभिनेता गोविंदा यालाही चिखलीत फिरविले. अपक्ष रविकांत तुपकर यांनी अडीच लाख मते घेतल्यास याचा फटका थेट खा. प्रतापराव जाधव यांना बसू शकतो, असे खुद्द शिवसेना गोटातूनच ऐकावयास मिळत आहे. लोकसभा मतदारसंघात रा. स्व. संघधर्जिणे सव्वालाख मते असून, याचा फायदा निश्चितच खासदार जाधव यांना होईल, असा काहींचा व्होरा आहे, पण काही भाजपवाल्यांनी पाना चालवल्याची चर्चादेखील कानावर पडत आहे. मेहकरसह काही तालुक्यातील वाढलेला मतांचा टक्का कोणाला धक्का देतो हे पाहणेही औत्सुक्याचे आहे. अशाही परिस्थितीत खा. प्रतापराव जाधव निवडून आल्यास तो जिल्ह्याच्या पटलावर इतिहास होईल, हेही तितव्ाâेच खरे. एकंदरीत हे सर्व ठोकताळे आहेत. ४ जूनला मतमोजणी होणार असून नेमका’ निकाल’ कोणाचा लागतो, याची उत्कंठा जिल्हावासीयांना लागली आहे.