Head linesNAGARPachhim Maharashtra

नारळी सप्ताहाच्या समारोपाला घोगस पारगावला उसळला अभूतपूर्व जनसागर!

– महंत डॉ.न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन व जय भगवान ग्रूपचा महाप्रसाद!
– आशीर्वादासाठी राजकीय पुढार्‍यांची सप्ताहात मांदियाळी!

शिरूर कासार/नगर (बाळासाहेब खेडकर) – तालुक्यातील घोगस पारगाव येथे श्रीक्षेत्र भगवानगडाचा ९० वा नारळी सप्ताह २१ तारखेपासून सुरू होता. काल, रविवारी या सप्ताहाचा समारोप महंत डॉ. न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला, तर संत भगवानबाबा ग्रूपने महाप्रसाद दिला. जवळपास दोन लाख भाविकांच्या उपस्थितीने जनसागराचे विशाल दर्शन घडले. तीव्र उष्णतेचे शरीराला चटके बसत असले तरी अंतःकरणाला गुरू भावकृपेचा गारवा शांत करून देत असल्याची अनुभूती येत असल्याचे भाविक बोलत होते.

दिनांक २१ एप्रिलरोजी नारळी सप्ताहाचा प्रारंभ झाला होता. संत भगवानबाबांच्या ऐश्वर्याला शोभेल असेच नियोजन केले गेले होते. सायंकाळी पाच ते सात यावेळेत शास्त्रीजींच्या रसाळ आणि मधाळ वाणीतून ज्ञानेश्वरीचे भावदर्शन आणि आनंदाचे सिध्दांत कानामनाची तृप्ती करून देत होते. सायंकाळच्या कीर्तनालादेखील भाविकांची अलोट गर्दी होत होती. सेवेत कुठेच कमी पडू नये, यासाठी महिलांसह पारगावकर अत्यंत परिश्रम घेत होते. शनिवारी रात्री महंत डॉ.न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचे कीर्तन आजवरचा सर्व उच्चांक मोडीत काढून गेले होते. भव्य मिरवणुकीने कीर्तन व्यासपीठावर शास्त्रीजींचे रथातून आगमन लक्ष्यवेधी ठरले होते. जवळपास दोन लाख भाविकांची उपस्थिती समारोपाला लाभली, या सर्वांना बुंदीचा प्रसाद एकाचवेळी देण्यात आला.


राजकीय पुढार्‍यांचीही उपस्थिती मात्र गडाच्या आदेशाचे पालन; भाषणबाजीला संधी नाही!

भगवानगडाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व प्रसादासाठी राजकीय पुढार्‍यांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. मात्र गडाच्या आदेशाचे पालन म्हणून भाषणबाजी झाली नाही. मंत्री धनंजय मुंडे, मावळत्या खासदार डॉ. प्रितम मुंडे या बहिणभावासह, नगर दक्षिणेतील लोकसभा निवडणुकीतील उमेदवार तथा आमदार नीलेश लंके, बाळासाहेब आजबे, अमरसिंह पंडित, ज्येष्ठ नेते प्रतापकाका ढाकणे, आ. मोनिकाताई राजळे आदींसह नेत्यांची राजकीय मांदियाळी येथे दिसून आली. परंतु, कुणालाही भाषणाची संधी मिळाली नाही. विशेष बाब म्हणजे, नगर दक्षिणेतील लोकसभेचे उमेदवार तथा मावळते खासदार डॉ. सुजय विखे व भाजपच्या नेत्या तथा बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे-पालवे यांची या समारोपाला असलेली अनुपस्थिती अनेकांना खटकली. दुसरीकडे, नीलेश लंके यांच्या उपस्थितीचे सर्वांना कौतुक वाटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!