– अंढेरा पोलिस ठाणेहद्दीत विनापरवाना डीजे लावाल तर खबरदार! : ठाणेदारांनी ठणकावले
अंढेरा/सिंदखेडराजा (हनिफ शेख/अनिल दराडे) – अंढेरा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विकास पाटील यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेचा आणखी एक परिचय आज दिला. एका सामाजिक कार्यकर्त्याला रस्त्याने दिसलेल्या अवघ्या २० वर्षीय तरूणीच्या कुटुंबीयांचा छडा लावून अवघ्या दोन तासांत ही तरूणी तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त करण्यात आली. ठाणेदारांच्या या सतर्कतेमुळे ही तरूणी चुकीच्या व्यक्तींच्या हाती पडण्यापासून वाचली, परिणामी तिचे जीवन नरकमय होण्यापासून बचावले. दुसरीकडे, विनापरवाना डीजे लावून लग्नसराई व महापुरूषांच्या मिरवणुकीत धिंगाणा घालणार्यांना चाप बसविण्यासाठी ठाणेदार पाटील यांनी आज पोलिस ठाणेहद्दीतील तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, पोलिस पाटील, सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक घेऊन डीजे चालकांना खणखणीत इशारा दिला. विनापरवाना डीजे लावल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे ठाणेदारांनी ठणकावले आहे.
सविस्तर असे, की मेरा खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते बाळू दराडे यांना आज (दि.२९) सकाळी १० वाजता मेरा फाट्यावर एक वेडसर तरूणी फिरत असताना दिसली. तिला नांव व गाव सांगता येत नसल्याने त्यांनी अंढेरा पोलिस स्टेशन येथे ठाणेदार विकास पाटील यांना या युवतीची माहिती दिली. ठाणेदार पाटील यांनी तातडीने पोलीस स्टेशन येथील कर्मचारी कैलास उगले यांना पाठवून त्या तरूणीला पोलिस ठाण्यात आणले, व तिला जेवण, पाणी देऊन तिची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. या चौकशीत सदर तरूणीने तिचे नाव नंदिनी सोनू कुंभार वय २० वर्षे रा. धानोरा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव असल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच ठाणेदार पाटील यांनी जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेतून धानोरा हे गाव कोणत्या पोलिस स्टेशन हद्दीत येते, याची माहिती काढली, तेव्हा हे गाव आडवद पोलिस स्टेशनमध्ये येत असल्याचे त्यांना समजले. आडवद पोलिस स्टेशनचे एपीआय चव्हाण यांना फोन करून या तरूणीची माहिती त्यांना दिली, तसेच फोटोदेखील पाठवला. तसेच, या तरूणीची मिसिंग वैगरे दाखल आहे का, याची विचारपूस केली. तेथील बीट जमादार तायडे यांनी या फोटो व माहितीच्या आधारे या तरूणीचा पती सोनू कुंभार याचा शोध लावला व त्याला चौकशीसाठी बोलावून त्याच्याकडून माहिती घेतली असता, ही तरूणी वेडसर असल्याचे त्याने सांगितले, तसेच चिखली येथील तिचे काका मिलिंद विजय हिवाळे, रा.गजानन नगर बुद्धविहारजवळ, चिखली यांचा नंबर दिला. ठाणेदार पाटील यांनी या तरूणीच्या काकांशी संपर्क साधून त्यांना अंढेरा येथे बोलावून घेतले असता, मिलिंद हिवाळे यांनी सांगितले की, आज (दि.२९) सकाळी ही तरूणी शौच्छासाठी बाहेर गेली असता, ती घरी परत आली नाही. त्यामुळे आम्हीच सकाळपासून तिचा शोध घेत होतो. ही तरूणी सकाळी चिखली येथून पायीच निघून मेरा फाट्यापर्यंत आली होती. या तरूणीवर कुणाची वाकडी नजर पडली असती तर मोठा अनर्थ घडला असता, परंतु ठाणेदार विकास पाटील यांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. हिवाळे व या तरूणीच्या कुटुंबीयांनी ठाणेदार पाटील यांचे आभार मानले आहेत. अवघ्या दोनच तासात या वेडसर तरूणीच्या कुटुंबीयांचा शोध लावून तिला तिच्या कुटुंबीयांकडे सुखरूप व सुरक्षित पोहोचविल्याबद्दल ठाणेदार पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास ही तरूणी तिच्या काकाच्या स्वाधीन करण्यात अली. ठाणेदार विकास पाटील, बीट जमादार कैलास उगले यांचे या वेडसर तरूणीचे काका मििंलद हिवाळे यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी आभार व्यक्त केले होते.
सध्या लग्नसराई जोरात सुरु असून, वरात असो किंवा मिरवणुकीत डीजे वाजविल्या जात आहे. ज्या डीजेचा आवाज मोठा आहे त्यांचे पैसेही डबल असून, आजकाल याबाबत मोठीच स्पर्धा निर्माण झाली आहे. या मोठ्या आवाजामुळें वयोवद्ध ग्रामस्थ, लहान मुले, महिला यांना अतोनात त्रास होत आहे. तसेच घराच्या भिंतीदेखील हादरत असून, कानाचे पडदे फाटणे, रक्तदाब वाढणे, हृदयविकाराचा धक्का बसणे, आदी त्रास होत आहे. त्याची गंभीर दखल घेत, आज (दि.२९) रोजी पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांच्या आदेशानुसार, ठाणेदार विकास पाटील यांनी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, पोलिस पाटील व पत्रकार यांची बैठक घेतली, व या बैठकीतून डीजे चालकांना सक्त सूचना केल्या आहेत. अंढेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत लग्न असो, किंवा कोणत्याही प्रकारची मिरवणूक असो, डीजे लावायचा असेल तर संबंधितांना रीतसर परवानगी घ्यावी लागेल. असे न केल्यास संबंधित डीजे जप्त करण्यात येऊन डीजे चालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणेदार पाटील यांनी दिला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र जोरदार स्वागत होत आहे.