Breaking newsBuldanaBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

‘शिकार’ कुणाची झाली व कुणी केली?

– नरूभाऊंनी वाट वाकडी करून घेतली तुपकरांची भेट; जिल्ह्याच्या राजकारणात ‘सहमती एक्स्प्रेस’ जोरात!
– अवघ्या एका तासात १० टक्के मतदान कसे वाढले?; नरूभाऊ आणि रविकांत तुपकरांनीही ‘भानावर’ येण्याची गरज!

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिलरोजी अखेर मतदान पार पडले. साडेपाच वाजेपर्यंत ५२-५४ टक्क्यांच्या आसपास झालेले मतदान पुढील तासाभरात तब्बल १० टक्क्यांनी वाढले, व अखेरशेवटी ते ६२.०३ टक्के झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले. हे वाढीव मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार आहे? ते खरेच झाले का?, याबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे महाआघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी भानावर येऊन त्याची दखल घेण्याची गरज आहे. नाही तर दोघांनी मिळून केलेली ‘शिकार’ तोंडातून निसटू शकते. जिल्ह्यातील कोणत्याही गावात कुणालाही विचारले तर सर्वजण आमच्याकडे ‘पाना’ चालला, तर कुठे ‘मशाल’ चालली असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे तुपकर क्रमांक एकवर तर नरूभाऊ क्रमांक दोनवर दिसून येत आहेत. या दोघांपैकी कुणी तरी एकजण बुलढाण्याचा खासदार होणे निश्चित मानले जात असताना, प्रतापराव जाधव निवडून आले तर तो एक राजकीय चमत्कारच ठरेल, अशी राजकीय जाणकरांत चर्चा आहे. परवा, नरूभाऊंनी वाट वाकडी करून तुपकरांचे जनसंपर्क कार्यालय गाठले, व एकमेकांची ख्यालीखुशाली विचारली. राजकारणातला हा मनमोकळेपणा हरवत चालला असताना या दोघांच्या भेटीने जिल्ह्यात सकारात्मक संदेश गेला आहे. खरे तर या दोघांनी मिळूनच प्रतापरावांची ‘शिकार’ केली असल्याचे उघड गुपित आहे. अख्ख्या लोकसभा निवडणुकीत या दोघांनी एकमेकांवर टीकाटिपण्णी केली नाही. दोघांचे हल्ले फक्त प्रतापरावांवर होत होते. त्यामुळे नरूभाऊंच्या या भेटीत अनेक रहस्ये दडलेले असून, ते नजीकच्या काळात उघड होईलच!

लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. २६ एप्रिलरोजी मतदान घेण्यात आले. या मतदानामध्ये बुलढाणा मतदारसंघासाठी ६२.०३ टक्के मतदान झाले. दुपारी साडेपाच वाजेपर्यंत ५२ ते ५४ टक्के असलेली मतदानाची आकडेवारी अंतिमतः उशिरा जेव्हा जाहीर झाली, तेव्हा ती जवळपास १० टक्क्यांनी वाढली होती. सहा वाजेनंतरही अनेक मतदान केंद्रांवर रांगा होत्या, ही बाब सत्य असली तरी, अवघ्या तासाभरात १० टक्के मतदान होणे, ही बाब अतार्किक आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेवर संशय निर्माण होत आहे. बरे हे वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडणारे आहे? आणि ते खरेच झाले की प्रशासकीय गडबड आहे? याबाबतही तर्कवितर्क केले जात आहेत. त्यामुळे लोकचर्चेतून ‘लीड’वर असलेल्या रविकांत तुपकर व नरेंद्र खेडेकर यांनी सावध होण्याची गरज आहे. युद्धांत जिंकून तहात हरल्यासारखी गत होण्यास वेळ लागणार नाही. बुलढाणा, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार, खामगाव, शेगाव व चिखली या तालुक्यांत रविकांत तुपकर व नरेंद्र खेडेकर यांच्यात सरळ लढत झाली असून, ‘पाना’ व ‘मशाल’ चालल्याचेच मतदारांचे सांगणे आहे. मेहकर, जळगाव जामोद या तालुक्यांत ‘धनुष्यबाण’ व ‘पाना’ यांच्या ठळक लढत झाली असून, ‘पाना’ व ‘धनुष्यबाण’ चालल्याचे मतदारांचे सांगणे आहे. त्यावरून तुपकर आणि खेडेकर यांच्यातील प्रमुख लढतीचे चित्र पुढे येत आहे. सहाजिकच लोकं सांगतात ते खरे असेल तर तुपकर किंवा खेडेकर हेच खासदार होणे क्रमप्राप्त आहे. तसे झाले नाही तर मात्र लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास उडू शकतो!
लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. परंतु, ठाकरे यांनी आपला दिलेला शब्द पाळून प्रा. नरेंद्र खेडेकर यांनाच महाआघाडीची उमेदवारी दिली. त्यामुळे तुपकरांना नाईलाजाने अपक्ष लढावे लागले. तुपकर हे शिवसेनेचे उमेदवार असते तर उद्धव ठाकरेंना बुलढाण्यात आता फक्त गुलाल उधळण्याचीच तयारी करावी लागली असती. तरीदेखील अख्ख्या लोकसभा निवडणुकीत तुपकर किंवा खेडेकर यांनी एकमेकांवर टीकाटिपण्णी केली नाही. या दोघांच्या टिकेचा रोख प्रतापराव जाधवांवर होता. तुपकरांनी जाधवांना निष्क्रिय खासदार ठरवले तर खेडेकरांनी गद्दार नेता म्हणून त्यांच्यावर टीका केली. शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ”तुपकरांची शिकार करण्याचा इशारा” दिला असला तरी, लोकसभेच्या निवडणुकीत खरी ‘शिकार’ तर तुपकर-खेडेकर या जोडगोळीने प्रतापरावांची केली असल्याचे शिंदे सेनेला निवडणूक निकालात दिसून येईल. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे नरूभाऊंनी वाट वाकडी करत तुपकरांच्या कार्यालयात जाऊन चहापानी घेत दाखवून दिले. परंतु, तुपकरांच्या कुटुंबावर टीकेचे आसूड ओढून ही दिलदारपणाची संधी शिंदे सेनेच्या नेत्यांनी घालवली आहे.


रविकांत तुपकर हे जिंकले तर खासदार होतील, हरले तर विधानसभेला आमदार होऊन राज्य मंत्रिमंडळात मंत्री होतील, हे निश्चित आहे. कारण, तुपकरांचे राजकीय भवितव्य उज्वल आहे. लोकसभा निवडणूक ही त्यांच्यासाठी ‘लिटमस टेस्ट’ होती. परंतु, या निवडणुकीत प्रतापराव जाधवांचा पराभव झाला तर मात्र शिंदे सेनेसाठी ती धोक्याची घंटा ठरेल. विशेष करून, प्रतापरावांच्या राजकारणाला लगाम घालण्याचा तो प्रकार ठरेल. ”मेहकरचा गारूडी पेटार्‍यात बंद” केल्याचे प्रतापराव गर्वाने सांगत असतात. लोकसभा निवडणुकीत तुपकर-खेडेकरांच्या ‘सहमती एक्स्प्रेस’ने ‘प्रतापगड’ उद्धवस्त केला तर मात्र त्याचे दूरगामी परिणाम जिल्ह्याच्या राजकारणात दिसून येतील, आणि ते शिंदे सेनेसाठी फारसे चांगले राहणार नाहीत. या निवडणुकीत भाजपचे नेते फारसे चर्चेत आले नाहीत. भाजपच्या चाणक्यांची खेळी निवडणूक निकालानंतर सुरू होईल.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!