– ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न, शिक्षक ठाकरे दाम्पत्याचा झाला हृदय सत्कार!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम हे गाव तसे निष्काम कर्मयोगी संत पू. शुकदास महाराज यांच्या निष्काम सेवेने संपूर्ण देशात ओळखले जाते. आता हे नाव आणखी उंच भरारी घेताना दिसत आहे. येथील वर्षा अशोक ठाकरे, सुनील सूळ, व योगेश देशमुख या शिक्षकांच्या प्रयत्नातून यावर्षी तब्बल ५४ विद्यार्थ्यांची नवोदय प्रवेशासाठी निवड झाली आहे. ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न म्हणून येथील शिंदे कुटुंबीयांनी शिक्षक ठाकरे दाम्पत्याचा हृदय सत्कार केला. खासगी शिकवणी क्लासेसच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाने हिवरा आश्रम हे लातूर व पुणे पॅटर्नप्रमाणे आता नावारूपाला येत आहे. त्यातच ‘नवोदय’साठी राज्यात आता हिवरा आश्रम पॅटर्न निर्माण झाला आहे.
ग्रामीण भागातील होतकरू, मेहनती व गुणवान विद्यार्थी परिस्थितीअभावी दर्जेदार शिक्षण पूर्ण करू शकत नाही. याचा सारासार विचार करत तत्कालीन प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांनी १९८६ मध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना केली. देशात तब्बल ६५० चेवर नवोदय विद्यालय कार्यरत आहेत. आतापर्यंत या विद्यालयातून लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठमोठ्या हुद्द्यावर काम करत आहेत. जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश पात्र परीक्षा घेतली जाते. यावर्षी जिल्ह्यातील शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावीसाठी प्रवेश पात्र परीक्षा घेण्यात आली. यामध्ये तब्बल १२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले असल्याची माहिती आहे. यातून केवळ ८० विद्यार्थ्यांना इयत्ता सहावीसाठी प्रवेश दिला जातो. सदर परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. यामध्ये मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील वर्षा अशोक ठाकरे यांच्या शिकवणीचे ३३ तर सुनील सूळ व योगेश देशमुख यांचे २१ असे तिघांच्या प्रयत्नाने तब्बल ५४ विद्यार्थी सदर परीक्षा पास झाले आहेत.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये चेतना शेषराव शिंदे, कुणाल प्रमोद झाल्टे, सुमित खिल्लारे, अंशुनी आहेर, शरयु लखाडे, संबोधी गवई, तेजस गिर्हे, स्वप्नील बराटे, गौरी खोंड, शिवराज गायकवाड, मयंक इंगळे, सोहम घायाळ, सांची वाकुडकर, अजिंक्य ठेंग, प्रथमेश वायाळ, कुणाल अंभोरे, स्नेहल गिते, कार्तिक भगत, गुंजन बोडके, आदित्य सवडतकर, सम्यक मोरे, माही गर्दे, स्वरूप गायकवाड, वेदांत लहाने, यश राऊत, आर्यन गवळी, पृथ्वीराज धांडे, अविष्कार राठोड, साई आढाव, विश्वराज सरनाईक, तनुश्री काटे, आदिती घुगे, वेदश्री काळे, अथर्व हरणे, देविदास चव्हाण, संस्कार काळवाघे, अभिमन्यू वायकुळे, अनघा येवले, श्रध्दा मुळे, आकांक्षा धोंडगे, संतोषी देवकाते, प्रिती दळवे, वेदांत पागोरे, संकल्प सवडतकर, आलिया सय्यद, सय्यद हुसेन, विरेन देशमुख, निशांत खरात, अपेक्षा शिंगणे, हर्षल डाखोरे, श्रावणी काळे, मितेश लोधी, करण लथाड, प्रेक्षा वाघ आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील काही विद्यार्थी अकोला, वाशिम, जालना जिल्ह्यातीलसुध्दा आहेत.
ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न म्हणून कुमारी चेतनासह शेषराव शिंदे कुटुंबीयांनी शिक्षक अशोक ठाकरे दाम्पत्याचा काल, ३ एप्रिल रोजी हृदयसत्कार केला. घसघशीत निकाल पाहता नवोदयसाठी आता हिवरा आश्रम पॅटर्न भरारी घेत असून, याला पालकांचाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बाराबारा तास मेहनतीचे हे फळ असल्याचे संबंधितांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र ‘शी बोलताना सांगितले. नवोदय विद्यालय प्रवेश पात्रता परीक्षेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यी बसावे, यासाठी जवाहर नवोदय विद्यालय शेगावचे प्राचार्य आर.आर. कसर, उपप्राचार्य देशमुखसह शिक्षक व कर्मचार्यांनी विशेष मेहनत घेतली.