‘अर्ज भरणे हा गेम प्लॅन, तो यशस्वी झाला’; आ. संजय गायकवाडांची स्पष्टोक्ती!
– प्रतापरावांना निवडून आणण्यासाठी आ. गायकवाड जोरदार प्रयत्न करणार!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – मी उमेदवारी अर्ज भरण्यामागे एक विशिष्ट कारण होते. ही माझी योजना होती, ती योजना यशस्वी झाली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ, असे स्पष्ट संकेत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, आ. गायकवाड यांनी अर्ज का भरला होता? या घटनाक्रमामागची बातमी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने यापूर्वीच प्रसारित केली होती. हे वृत्त सत्य असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. बुलढाण्याच्या जागेसाठी भाजपने पहिल्या दिवसापासून दबाव निर्माण केला होता. त्यामुळेच शिंदे गटाच्या पहिल्या यादीत मावळते खासदार तथा शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रतापराव जाधव यांचे नाव घेण्यास टाळाटाळ चालू होती. परंतु, आ. गायकवाड यांनी अर्ज भरण्याची खेळी करताच, भाजप बॅकफूटवर गेले व त्याच दिवशी जाहीर झालेल्या पहिल्या यादीच खा. जाधव यांचे नाव भाजपच्या अनुमतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर करावे लागले होते.
शुक्रवारी बुलढाणा येथे महायुतीचा मेळावा पार पडला.या मेळाव्यानंतर आ. संजय गायकवाड यांनी लोकसभेसाठी तडकाफडकी उमेदवारी अर्ज भरण्यामागची भूमिका प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना स्पष्ट केली. आपली निवडणूक लढविण्याची कोणतीही योजना नसून, मी पक्षाकडे तसा कोणताही अर्ज केलेला नाही. पण, मला जे साध्य करायचे होते, ते केले आहे. जे काम करत नाहीत, लोकं ओळखत नाहीत, असे लोकं निवडणूक लढविण्याची भाषा करत आहेत. मी तर चोवीस तास काम करतो. जाधवांशी भेट झाली परंतु अर्ज मागे घेण्यावर चर्चा झाली नाही, असे सांगून आ. गायकवाड यांनी सस्पेन्स निर्माण करण्याचाही प्रयत्न केला आहे. दरम्यान, आज (ता.२९) शुक्रवारी बुलढाणा येथे पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये आ. गायकवाड यांनी आपल्या भाषणातून खासदार प्रतापराव जाधव यांना निवडून आणण्याचे आवाहन केले आहे.
लोकसभेसाठी आ. संजय गायकवाडांकडून अर्ज दाखल; माघारीचेही संकेत!