लोकसभेसाठी आ. संजय गायकवाडांकडून अर्ज दाखल; माघारीचेही संकेत!
– लवकरच महायुतीचे जागावाटप जाहीर होणार; बुलढाण्याची जागा भाजपला कुणासाठी हवी?
मुंबई/बुलढाणा (खास प्रतिनिधी) – बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झाला नसला तरी, विद्यमान खासदार व शिंदे गटाचे संपर्कप्रमुख प्रतापराव जाधव हे कामाला लागले आहेत. परंतु, वरिष्ठस्तरीय राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, बुलढाण्याच्या जागेसाठी भाजपने दबाव वाढविला असून, आ. श्वेताताई महाले या लोकसभेसाठी इच्छूक नसताना भाजपला कुणासाठी ही जागा हवी आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वंचित बहुजन आघाडीने माळी समाजाचा उमेदवार दिल्याने महायुतीचे गणित बिघडले असून, प्रतापरावांना मिळणारी हक्काची मते विभाजीत होणार असल्याने भाजप सावध खेळी खेळत असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप बुलढाण्यासाठी दबाव वाढवित असल्याची चर्चा असताना, शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आज (दि.२८) दुपारी तडकाफडकी लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गायकवाड यांचे अर्ज दाखल करणे म्हणजे भाजपवर दबाव आणण्याची राजकीय खेळी असल्याची जोरदार चर्चा मुंबईतील राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, आ.गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलताना माघारीचे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे ही खेळी स्थानिक पातळीवरूनच खेळली गेली असावी, अशीही राजकीय चर्चा सुरू झालेली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची एक उमेदवारी यादी फायनल झाली असून, ती लवकरच जाहीर होत आहे. या पहिल्या यादीत बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव सुरूवातीला नव्हते, असे खास सूत्राचे म्हणणे आहे. त्यामुळेच की काय, आ. संजय गायकवाड यांनी तडकाफडकी उमेदवारी अर्ज दाखल करून, भाजप व मुख्यमंत्र्यांवर दबाव निर्माण केला असावा, अशीही चर्चा होत आहे. दरम्यान, शुक्रवारी तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित पत्रकार परिषद घेवून जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना आ. गायकवाड यांनी सांगितले, की मी अर्ज दाखल करावा, अशी माझ्या कार्यकर्त्यांची आणि जनतेची इच्छा होती. मला वरून आदेश वगैरे काही नाही. मुख्यमंत्र्यांचा फोन आलेला होता. तो नेहमी येतो. माझा अर्ज शेवटपर्यंत असेल की नाही हे आत्ताच निश्चित सांगता येणार नाही. शिवसेनेच्या, महायुतीच्यावतीनेच मी अर्ज दाखल केलाय पण पक्षाचा एबी फॉर्म नाहीये. परंतु असे असले तरी मुख्यमंत्र्यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम असेल, असे सांगत माघारीचे संकेतही त्यांनी दिलेले आहेत. विशेष म्हणजे, अर्ज दाखल करतेवेळी आ. गायकवाड यांच्यासोबत महायुतीचा एकही मोठा पदाधिकारी किंवा नेता नव्हता.
विशेष म्हणजे, बुलढाण्यात महायुतीत सर्वकाही ऑलवेल नाही. आपल्या नेत्यांना सन्मान दिला जात नाही, त्यामुळे बुलढाणा लोकसभेसाठी खासदार प्रतापराव जाधव यांना तिकीट मिळाल्यास आम्ही त्यांचे काम करणार नाही, असा थेट इशारा एका भाजप पदाधिकार्यांकडून देण्यात आला होता. महायुतीच्या संवाद मेळाव्यांत चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील व प्रारंभी खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांना डावलल्या गेल्याचा आरोप झाले होते. यावरूनच महायुतीतील बेबनाव समोर आला होता. तसेच, भाजपच्या सर्वेक्षणातही खा. प्रतापराव जाधव यांच्याबद्दल अनुकूल मत आलेले नाही. तसेच, वंचित बहुजन आघाडीने वसंतराव मगर यांच्यासारख्या जुन्या शिवसैनिकाला उमेदवारी दिली असून, मगर हे माळी समाजाचे आहेत. आतापर्यंत माळी समाजाने प्रतापराव जाधव यांना आपली मते देऊन त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे. यावेळेस प्रतापरावांच्या हक्कांच्या मतांचे विभाजन होणार आहे. दुसरीकडे, कट्टर शिवसैनिकांचा रोष, विरोधात प्रा. नरेंद्र खेडेकर व वसंतराव मगर यांच्यासारखे जुने सहकारी यामुळे प्रतापराव जाधव चांगलेच कोंडीत सापडले आहेत. वसंतराव मगर हे माळी व दलित समाजाची मते घेणे क्रमप्राप्त असल्याने खेडेकर व जाधव हे दोन्हीही शिवसेनेचे उमेदवार सद्या अडचणीत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून तयारी करणार्या भाजपला हा मतदारसंघ आपल्याकडे हवा आहे, असे राजकीय सूत्राचे मत आहे. तसा जोरदार दबावदेखील भाजपच्या नेतृत्वाने तयार केला होता. परंतु, स्थानिक पातळीवरून शिंदे गटातून आ. संजय गायकवाड हे आक्रमकपणे पुढे येत असल्याने या मतदारसंघात भाजप काय भूमिका घेते हे आज व उद्या स्पष्ट होणार आहे.
लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवार म्हणून आ. श्वेताताई महाले यांच्याकडे पाहिले जात आहे. परंतु, घाटाखालील एका नेत्याला ही बाब खटकत असल्याचे सांगण्यात येते. तथापि, स्वतः श्वेताताई महाले यांनी लोकसभेसाठी सद्या तरी संधी नको, असे पक्ष नेतृत्वाला कळवलेले आहे. असे असताना भाजप ही जागा कुणासाठी मागून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे लोकसभा लढविण्यावर ठाम असून, ते २ एप्रिलच्या खास मुहुर्तावर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तेदेखील भाजपच्या एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात होते. तुपकरांना भाजपमध्ये घेऊन त्यांना लोकसभेसाठी एबी फॉर्म दिला तर बुलढाण्याची ही जागा मोठ्या मताधिक्क्याने भाजपला जिंकता येणे शक्य आहे. त्यादृष्टीने तर पडद्याआड काही सूत्रे हलत नाही ना, अशीदेखील राजकीय चर्चा रंगताना दिसत आहे.
———-
‘आयुष्यात पहिल्याच वेळेस खासदारकीचा अर्ज भरला आहे. मला कोणाचाही आदेश नव्हता, पक्ष संघटनेच्या आग्रहाखातीर मी अर्ज दाखल केला, ‘ अशी प्रतिक्रिया आ संजय गायकवाड यांनी दिली आहे.
—-
दरम्यान, अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांना तात्काळ फोन करुन याबाबत विचारणा केली. यावेळी संजय गायकवाड यांनी साहेब मी तुमच्या शब्दाबाहेर नाही, मी मरेल पण तुमच्या पुढे जाणार नाही, असे सांगितले. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख कधी आहे असे विचारले असता, ४ तारीख असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, महायुतीच्या जागावाटपांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, मंत्री उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड, खासदार सुनील तटकरे यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांनी काल (बुधवारी) रात्री महत्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राजकीय स्थितीची अतिशय मुद्देसूद अशी माहिती सर्व नेत्यांना दिली होती. त्यानुसार, जागावाटपाबाबत चर्चा झाली होती. या चर्चेत भाजप २६, शिवसेना १३, राष्ट्रवादी ६ आणि राष्ट्रीय समाज पक्ष १ आणि मनसेला २ जागा देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाचे संभाव्य उमेदवार
रामटेक – राजू पारवे (अर्ज दाखल) – कृपाल तुमाने यांचा पत्ता कट
बुलढाणा – प्रतापराव जाधव
यवतमाळ-वाशिम – भावना गवळी / संजय राठोड
हिंगोली – हेमंत पाटील
कोल्हापूर – संजय मंडलिक
हातकंणगले – धैर्यशील माने
नाशिक- हेमंत गोडसे
मावळ -श्रीरंग बारणे
शिर्डी – सदाशिव लोखंडे
दक्षिण-मुध्य मुंबई – राहुल शेवाळे
कल्याण-डोंबिवली – डॉ. श्रीकांत शिंदे
————-