बुलढाणा जिल्हा हादरला; महसूल पथकावर वाळूतस्करांनी ट्रॅक्टर चढविला; सुदैवाने वाचले प्राण!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – महसूल विभागाने खडकपूर्णासह इतर नदीपात्रांतील वाळूचोरी रोखण्यासाठी धडक कारवायांचा सपाटा लावल्याने खवळलेल्या वाळूतस्करांनी महसूलचे हे अधिकारीच जीवे ठार मारण्याचे प्रयत्न चालवले आहेत. तहसीलदार सचिन जैस्वाल यांच्यासह महसूलचे पथक अवैध वाळू उपसा करणार्या वाळूतस्करांवर धाड टाकून कारवाई करण्यासाठी निमगाव वायाळ शिवारातील खडकपूर्णा नदीपात्रात गेले असता, वाळूमाफियांनी तहसीलदारांसह या पथकाला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या पथकाच्या अंगावर सरळ ट्रॅक्टर घालण्यात आले, परंतु सतर्कतेने हे पथक वाचले आहे. परवा रात्री साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला. याप्रकरणी किनगावराजा पोलिसांत अज्ञात ४० ते ५० हल्लेखोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
सिंदखेडराजा तहसीलदार व त्यांचे कर्मचारी हे अवैध रेती उपसा व वाहतूक करणार्या माफियांच्या हस्तकांना रंगेहाथ पकडून कारवाई करण्यासाठी तालुक्यातील निमगाव वायाळ शिवारातील खडकपूर्णा नदीपात्रात गेले असता रेतीमाफियांच्या हस्तकांच्या टोळीने या कर्मचार्यांवर ट्रॅक्टर घालून जीवे ठार मारण्याचा अमानुष प्रयत्न केला. दि. २६ मार्चच्या सायंकाळी ६.३० ते ७.०० वाजेदरम्यान ही थरारक घटना घडली आहे. याप्रकरणी किनगावराजा पोलिस ठाण्यात ४० ते ५० अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तहसीलदार सचिन जैस्वाल व त्यांचे तलाठी कर्मचारी यशवंत घरजाळे, विष्णू थोरात व पथकातील इतर कर्मचारी अवैध रेती चोरी करणार्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सुमारे ४० ते ५० इसम चार ट्रॅक्टरमध्ये रेती भरतांना आढळून आले. मोबाईलमध्ये शूटिंग करत चारही ट्रॅक्टर पथकाने ताब्यात घेतले. याच दरम्यान ट्रॅक्टरचे चालक व ४० ते ४५ हस्तक पळून गेले. मात्र थोड्याच वेळात पळून गेलेले वाहन चालक व हातात फावडे घेतलेले हस्तक मजूर हे जप्त केलेल्या ट्रॅक्टरजवळ परतले. एका ट्रॅक्टर चालकाने तलाठी कर्मचारी यशवंत घरजाळे, विष्णू थोरात यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जर ट्रॅक्टरचा पाठलाग केला तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तीन ट्रॅक्टर पळवून घेऊन गेले. ह्या सर्व प्रकाराच्या आवाजाने निमगाव वायाळ येथील ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. तर चौथे ट्रॅक्टर पळवून नेण्याचा प्रयत्न करीत असतांनाच तहसीलदार सचिन जैस्वाल व इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर चौथे ट्रॅक्टर महसूल विभागाने ताब्यात घेतले.
याप्रकरणी किनगावराजा पोलिस ठाण्यात अप. नं. ७२/२०२४ कलम ३५३, ३७९, ५०६, १४३, १४७, १४९ भादंवि सहकलम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे तालुक्यातील ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ यातून सुरु असलेल्या रेतीमाफियांच्या कारवाया जगजाहीर झाल्या आहेत. आता हे प्रकार बंद होतात की काही दिवसांनी पुन्हा चालू होतात? याकडे खडकपूर्णा नदीच्या तीरावरील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. काल, २७ मार्च रोजी किनगावराजाचे ठाणेदार विनोद नरवाडे व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तलाठी घरजाळे व ग्रामस्थ यांच्यासह सरपंचपती रामेश्वर चाटे हजर होते. महसूल पथकाला चिरडण्याचा प्रयत्न करून वाळूतस्करांनी धाक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
——–