सोलापुरात प्रणिती शिंदेंविरोधात राम सातपुते लढणार; भाजपची १११ जणांची यादी जाहीर
– भाजपच्या यादीत अभिनेत्री कंगणा रणौत, अभिनेते अरूण गोविल यांना मिळाली संधी!
मुंबई/नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाने आपली तिसरी यादी जाहीर केली असून, महाराष्ट्रातील तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपचे युवानेते राम सातपुते यांना सोलापूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुनील मेंढे यांना भंडारा-गोंदियाच्या जागेसाठी तर अशोक महादेवराव नेते यांना गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. एकीकडे माढाच्या जागेवरून वाद सुरू असताना भाजपने सोलापुरात मात्र सावध खेळी खेळली आहे. आता सोलापुरात आमदार कु. प्रणिती सुशीलकुमार शिंदेविरुद्ध राम सातपुते अशी लढत पहायला मिळणार आहे. आज भाजपने १११ उमेदवारांची नावे जाहीर केली. अभिनेत्री कंगना रनौतला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून उमेदवारी देण्यात आली असतानाच, वरुण गांधी आणि संघमित्रा मौर्य यांचे तिकीट मात्र कापले गेले आहे. मनेका गांधी यांना मात्र उमेदवारांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. यापैकी २० जणांची यादी भाजपाने आधीच जाहीर केली आहे. त्यामुळे शिंदे गट व अजित पवार गटाला मिळणार्या जागा या बाकी २५ जागांमधून राहतील.
दरम्यान, मुंबईतदेखील वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे पक्षांतर्गत बैठका घेत असून, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठकही झाली. या बैठकीत महायुतीचे जागावाटप निश्चित झालेले आहे. उद्या किंवा परवा अजित पवार गट व शिंदे गट आपल्या उमेदवारांची घोषणा करू शकते. महादेव जानकर यांनी महायुतीसोबत राहणेच पसंत केले असून, जानकर यांनीदेखील आजच्या बैठकांना हजेरी लावली. महायुतीकडून लोकसभेची एक जागा जानकर यांना दिली जाणार आहे, असे अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपच्या आजच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर सुल्तानपूरमधून मेनका गांधी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच, रामायण या बहुचर्चित मालिकेतील अभिनेते अरूण गोविल यांनाही भाजपने उमेदवारी दिली असून, ते मेरठमधून निवडणूक लढणार आहेत. रामायण मालिकेत रामाची भूमिका करुन घराघरांत पोहोचल्याने ते लोकप्रिय चेहरा ठरलेले आहेत. यापूर्वी महाराष्ट्रात २०१४ आणि २०१९ यावेळी झालेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना सलग दोनदा पराभव पत्करावा लागला होता. वडिलांच्या पराभवाची सल दूर करण्यासाठी आता त्यांच्या कन्या आणि आमदार प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे. आता त्या पराभवाचा वचपा काढणार की या मतदारसंघात भाजप हॅटट्रिक साधणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
महाराष्ट्रातल्या पहिल्या यादीत जाहीर झालेले भाजप उमेदवार
नागपूर- नितीन गडकरी, नंदूरबार- हिना गावित, धुळे -सुभाष भामरे, जळगाव- स्मिता वाघ, रावेर- रक्षा खडसे, अकोला- अनुप धोत्रे, वर्धा- रामदास तडस, चंद्रपूर- सुधीर मनगुंटीवार, नांदेड- प्रताप पाटील चिखलीकर, दिंडोरी- भारती पवार, भिवंडी- कपिल पाटील, मुंबई उत्तर- गोयल, मुंबई उत्तर पूर्व – मिहीर कोटेचा, अहमदनगर -सुजय विखे पाटील, बीड- पंकजा मुंडे, लातूर- सुधाकर शृंगारे, माढा – रणजितसिंह नाईक निंबाळकर, जालना- रावसाहेब दानवे सांगली- संजयकाका पाटील, पुणे – मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे.