BULDHANACrime

ऐन होळीच्या दिवशी बापलेकावर काळाचा घाला; वडिल ठार, मुलगा गंभीर जखमी!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – ऐन होळीच्या दिवशी पिता-पुत्राच्या दुचाकीला भरधाव कारने भीषण धडक दिल्याने झालेल्या दुर्देवी अपघातात वडील ठार झाले असून, मुलगा गंभीर जखमी झाला आहे. आज दुपारच्या सुमारास हतेडी खुर्द शिवारात हा अपघात झाला. बाप-लेक हे शेतातील काम आटोपून होळी असल्याने लवकर घरी परत जात होते. ऐन होळीच्या दिवशी हतेडी खुर्द शिवारानजीत ही दुर्घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. शिवाजी म्हातारजी चव्हाण (५५ वर्ष ) असे मृत पित्याचे नाव आहे. विशाल शिवाजी चव्हाण (२८ वर्ष) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दोघे बापलेक केसापूर येथील शेतातील काम आटोपून घरी माळविहीरकडे निघाले होते. मात्र मध्येच एका कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. यात शिवाजी म्हातारजी चव्हाण यांना डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशाल गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. विशाल चव्हाण याला तात्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. चालक प्रमोद जय नारायण तुपकर (रा. काँग्रेस नगर, बुलढाणा) याच्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!