BULDHANACrimeVidharbha

आयएएस अधिकारी नरवाडे समर्थकांची अ‍ॅड. रोठेंना धमकी, शिवीगाळ; रोठेंच्या तक्रारीवरून बदली झाल्याने समर्थकांचा तीळपापड!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या काळात स्व-जिल्ह्यात नियुक्ती झाल्याने वादाच्या भोवर्‍यात सापडलेले आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांची बदली करावी, यासाठी राष्ट्रीय आजाद हिंद संघटना व आझाद हिंद शेतकरी संघटनेचे प्रमुख अ‍ॅड. सतीश रोठे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन आयोगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झालेल्या नरवाडे यांची त्याच पदावर धुळे येथे बदली केली आहे. या बदलीने खवळलेल्या नरवाडे समर्थकांनी आपल्याला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार अ‍ॅड. रोठे यांनी बुलढाणा पोलिसांत दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हे दाखल केले असून, त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. परंतु, निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांची स्वतःच्याच जिल्ह्यात नियुक्ती झाली होती. हा प्रकारे म्हणजे नियमांचा भंग असून, या नियुक्तीमुळे निवडणुकीत मतदारांवर याचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे या विरोधात आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश रोठे यांनी आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, ही तक्रार केल्यामुळे नरवाडे यांच्या समर्थक आणि नातेवाईकांनी अ‍ॅड. सतीश रोठे यांच्या कार्यालयासमोर जाऊन त्यांना अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप रोठे यांनी केला आहे. या प्रकरणी अ‍ॅड. रोठे यांनी बुलढाणा पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत यातील चार संशयित इसमांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
विशाल नरवाडे हे बुलढाणा जिल्ह्यातील धाड या गावाचे रहिवासी असून, २०२० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात त्यांची बदली बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली. खरेतर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कुठल्याही अधिकार्‍याला किंवा कर्मचार्‍याला त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यात निवडणूक काळात नियुक्ती देण्यात येत नसते. असा सक्त नियम असूनही विशाल नरवाडे यांची नियुक्ती निवडणुकीच्या तोंडावरच देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटल होते. परिणामी, विशाल नरवाडे यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय आजाद हिंद संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश रोठे यांनी या केली होती. तसेच या संबंधी मुख्य निवडणूक आयुक्तांना लेखी तक्रारदेखील केली होती. या तक्रारीची दखल घेत दोनच दिवसात विशाल नरवाडे यांची धुळे येथे बदली करण्यात आली. त्यामुळे खवळलेल्या नरवाडे समर्थकांनी आणि इतर नातेवाईकांनी अ‍ॅड. सतीश रोठे यांचा विरोध करत त्यांच्या कार्यालयासमोर जाऊन त्यांना अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अ‍ॅड. रोठे यांनी केला आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!