बुलढाणा मतदारसंघ काँग्रेसला घ्या, हर्षवर्धन सपकाळ यांनाच उमेदवारी द्या!
– बुलढाणा काँग्रेसला घेण्यासाठी महाआघाडीत प्रयत्न सुरू – सूत्र
बुलढाणा (बाळू वानखेडे) – बुलढाणा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडवून घ्या व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना उमेदवारी द्या, यासाठी काल काँग्रेसच्या तब्बल ११ तालुक्यांतील पदाधिकार्यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर आज (दि.२४) या सर्व पदाधिकार्यांनी जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना याच मागणीसाठी अमरावती येथे भेटून जोरदार साकडे घालण्यात आले. दरम्यान, याबाबत आपण पक्षाच्या नेतृत्वाशी चर्चा करू, असे आश्वासन ठाकूर यांनी या पदाधिकार्यांना दिले आहे. विशेष बाब म्हणजे, हर्षवर्धन सपकाळ हेदेखील नवी दिल्लीत वरिष्ठ नेतृत्वाला भेटून हा मतदारसंघ काँग्रेसला घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत महाआघाडीच्या बैठकीत चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला तर हर्षवर्धन सपकाळ यांनाच उमेदवारी निश्चित मानली जात असून, एका महिला नेत्याचा हिरमूड होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवड़णुकीसाठी महाविकास आघाडीकडून अद्याप जागावाटप झालेले नाही. तरीदेखील बुलढाणा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे आहे असे समजून शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कामाला लागले आहेत. ठाकरे यांच्याकडे या जागेसाठी तगडा उमेदवार नसल्याचा आक्षेप काँग्रेसने घेतलेला आहे. त्यामुळेच हा मतदारसंघ काँग्रेसला सोड़ावा यासाठी जिल्ह्यातील काही काँग्रेस पदाधिकारी यांनी आपले राजीनामे काल जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडे सुपूर्त केले होते. त्यानंतर आज जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकार्यांनी पक्षाच्या जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची त्यांच्या अमरावती येथील निवासस्थानी भेट घेऊन बुलढाणा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोड़ून घ्या, व माजी आमदार तथा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हर्षवर्धन सपकाळ यांना उमेदवारी द्या, अशी गळ घातली. यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने काँग्रेसकडून दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत असून, याचे परिणाम मात्र काय होतात, हे लवकरच समजेल. दरम्यान, मेहकर तालुक्यातील काँग्रेसचे नेते व खा. मुकूल वासनिक यांचे विश्वासू दिगंबर मवाळ यांनी लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकड़े उमेदवारी मागितली असून, दि. २३ मार्चरोजी जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.मुकूल वासनिक यांची दिल्ली येथे तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आज, दि. २४ मार्चरोजी नागपूर येथे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड़, जेष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे यांच्यासमवेत भेट घेवून लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा केल्याची माहिती आहे.