Breaking newsHead linesVidharbha

उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला दणका; अकोला (पश्चिम)मधील पोटनिवडणूक रद्द!

नागपूर (विशेष प्रतिनिधी) – विदर्भातील अकोला (पश्चिम) विधानसभा पोटनिवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती देऊन निवडणूक आयोगाला जोरदार चपराक दिली आहे. या पोटनिवडणुकीला आव्हान देणारी याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने मंगळवारी यावर सुनावणी करताना निवडणुकीवर स्थगिती दिली. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एम. एस.जवळकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्यामुळे ही निवडणूक रद्द करण्यात यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निकालामुळे नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे संभाव्य उमेदवार नीलेश लंके यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. ते लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहिले तरी, त्यांच्या पारनेर मतदारसंघात पोटनिवडणूक लावली जाण्याचा धोका आता टळला आहे.

देशभरात सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेबरोबरच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकदेखील केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. मात्र, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात याचिकाकर्ते अनिल दुबे यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने ही निवडणूक रद्द करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. याचिकाकर्ते अनिल दुबे यांनी मुख्य निवडणुकीला एक वर्षाहून कमी कालावधी असताना पोटनिवडणूक घेता येत नसल्याची तरतुद कायद्यात असल्याचा दावा आपल्या याचिकेत केला होता.
विधानसभा निवडणूक अगदी पाच-सहा महिन्यांवर असताना अकोला पश्चिममध्ये पोटनिवडणूक घेण्याची काय गरज आहे? ही पोटनिवडणूक घेऊन मतदारांना वेठीस धरले जात आहे, तसेच यंत्रणांवर अनावश्यक भार दिला जात आहे. चंद्रपूर, पुणे लोकसभेची पोटनिवडणूक एक वर्षाहून अधिक कालावधी असतानाही घेतली गेली नाही. मात्र, अकोल्यातील निवडणूक घेऊन सार्वजनिक पैशांचा चुराडा केला जात आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांने केला होता. न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या युक्तिवाद मान्य करत अकोला (पश्चिम) पोटनिवडणुकीची अधिसूचना रद्द करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्याच्यावतीने अ‍ॅड. जगविजयसिंग गांधी युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाच्यावतीने अ‍ॅड.श्रीकांत धारस्कर यांनी तर राज्य शासनाच्यावतीने अ‍ॅड.देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली.


गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने रिक्त झाली होती जागा!

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर झाला होता. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे नेते तथा आमदार गोवर्धन शर्मा यांनी 29 वर्षे भाजपचा झेंडा या मतदारसंघावर फडकवला होता. मात्र, 3 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, निवडणूक आयोगाने सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीबरोबरच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर केली होती. मात्र आता ही निवडणूक रद्द करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!